Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मॅच विनर खेळाडू फायनलमधून बाहेर? IPL 2025 Final आधीच RCB ला धक्का; कॅप्टननेच दिली माहिती

IPL 2025 Final RCB vs PBKS Tim David Injury Updates: आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माहिती.

मॅच विनर खेळाडू फायनलमधून बाहेर? IPL 2025 Final आधीच RCB ला धक्का; कॅप्टननेच दिली माहिती

IPL 2025 Final RCB vs PBKS Tim David Injury Updates: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वाचा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज सायंकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्हींपैकी कोणताही संघ जिंकला तरी त्यांची ही पहिलीच आयपीएल ट्रॉफी असल्याने कोणता संघ जेतेपदाचा आपला 18 वर्षांचा दुष्काळ संपवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांसाठी त्यांच्या आतापर्यंतच्या आयपीएल प्रवासातील हा सर्वात महत्त्वाचा सामना ठरणार असतानाच आरसीबीला या सामन्याआधीच एक मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा एक स्टार खेळाडू जायबंदी असल्याने म्हणजेच दुखापतीमुळे मागील काही सामन्यांपासून मैदानात उतरलेला नाही. आजच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात तो खेळला तर सामन्याच्या निकालावर बराच परिणाम होईल असं मानलं जात असतानाच तो अंतिम 11 मध्ये असेल की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. 

कोण आहे हा खेळाडू?

ऑस्ट्रेलियन संघामध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा आरसीबीच्या संघातील महत्त्वाचा फलंदाज असलेला टिम डेव्हिड गेल्या दोन सामन्यांमध्ये मैदानाबाहेरच दिसून आला. त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत असून त्याच्या अनुपस्थिती संघाला जाणवली नाही अशी कामगिरी त्याच्या इतर सहकाऱ्यांनी केली. आरसीबीने क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्जचा धुव्वा उडवत अगदी थाटात फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र फायनमध्ये डेव्हिडची उपस्थिती आरसीबीसाठी हुकुमी एक्का असल्यासारखी असेल. मात्र तो या सामन्यात अंतिम 11 मध्ये खेळणार की नाही याबद्दलचं गूढ सामन्याला काही तास शिल्लक असतानाही कायम आहे. 

कॅप्टन पाटीदार त्याच्याबद्दल काय म्हणाला?

सामन्यापूर्वी आयपीएल चषकाबरोबर झालेल्या कॅप्टन्स फोटो शूटनंतर पत्रकार परिषदेमध्ये आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टिम डेव्हिडच्या उपलब्धतेबद्दल भाष्य केल्याचं पाहाला मिळालं. "आतापर्यंत तरी आम्हाला टिम डेव्हिडच्या प्रकृतीबद्दल स्पष्ट स्वरुपातील माहिती मिळालेली नाही. आमची वैद्यकीय टीम आणि डॉक्टर त्याच्यासोबत असून आज संध्याकाळपर्यंत आम्हाला त्याच्या प्रकृतीसंदर्भातील सविस्तर माहिती मिळणं अपेक्षित आहे," असं पाटीदारने सोमवारी म्हटलं. यंदाच्या पर्वात आतापर्यंत टिम डेव्हिडने संघासाठी फारच समाधानकारक कामगिरी केली आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याने आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे जर तो अंतिम सामन्यात खेळू शकला नाही तर तो आरसीबीसाठी मोठा धक्का असेल. 

नक्की वाचा >> IPL 2025 Final जिंकणाऱ्या संघावर पडणार पैशांचा पाऊस; उपविजेताही होणार मालामाल; बक्षिसांची रक्कम...

किती रुपयांना विकत घेतलं आणि कामगिरी कशी?

डेव्हिड यंदाच्या पर्वात आयपीएलचे एकूण 12 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 187 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 185.14 इतका आहे. त्याने एक अर्धशतकही झळकावले आहे. आरसीबीने त्याला मेगा लिलावात 3 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलं आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे आरसीबीला मधल्या आणि खालच्या फळीत बहारदार खेळ करत डेव्हिडने अनेक वेळा कठीण परिस्थितीतून संघाला बाहेर येण्यास मदत केली आहे. आरसीबीकडून डेव्हिडचा यंदाचं पहिलेच पर्व आहे. त्यामुळे आता तो फायनलचा सामाना खेळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read More