Rajeev Shukla BCCI President : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्याचे अध्यक्ष रोजर बिन्नी यांचा कार्यकाल लवकरच संपण्याची शक्यता असल्याने आता अध्यक्ष पदावर नवीन चेहरा दिसणार आहे. 2022 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष झालेल्या बिन्नी यांचा कार्यकाल 19 जुलैला पूर्ण होईल. त्याच दिवशी त्यांचे वय 70 वर्षे होईल आणि बीसीसीआयच्या नियमानुसार, 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही पदाधिकारी पदावर राहू शकत नाही. यामुळेच रिपोर्ट्सनुसार सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. जोपर्यंत स्थायिक अध्यक्षाची निवड होत नाही तोवर राजीव शुक्ला तीन महिन्यांसाठी कार्यकारी अध्यक्षपद भूषवण्याची शक्यता आहे.
न्यूज एजन्सी ANI च्या वृत्तानुसार, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे जुलै महिन्यापासून तात्पुरते अध्यक्षपद दिलं जाणार आहे. त्याच महिन्यात बिन्नी 70 वर्षांचे होतील. शुक्ला यांचं वय सध्या 65 वर्षे असून सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक सभेत, तेस्थायिक अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून उभे राहू शकतात.
रोजर बिन्नी यांचा कार्यकाळ 2022 मध्ये सौरव गांगुलीच्या जागी अध्यक्ष पद स्वीकारून सुरू झाला. रोजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात भारताने ICC टी20 विश्वचषक 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे, महिला प्रीमियर लीगची सुरुवातही त्यांच्या कार्यकाळात झाली. ते देशातील क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी खूप काम करत राहिले. ज्येष्ठ खेळाडूंनी रणजी ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच, स्थानिक खेळाडूंना अधिक वेतन आणि सुविधा मिळाव्यात, यावर त्यांनी भर दिला.
बिन्नी हे भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू राहिले आहेत. त्यांनी भारतासाठी 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या संघात त्यांचा मोठा वाटा होता. त्या स्पर्धेत त्यांनी सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या आहेत.