IPL 2025 Mohammed Siraj On RCB IPL 2025: भारताच्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या मोहम्मद सिराज पहिल्यांदाच चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्सच्या जर्सीऐवजी दुसऱ्या संघाच्या जर्सीत खेळला. ज्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून इतक्या वर्ष सिराज खेळला त्याच संघाविरोधात तो गुजरातच्या टीममधून त्याच्या होम ग्राऊण्डवर खेळला. सिराज केवळ खेळला नाही तर त्याने सामाना जिंकवून देण्यातही मोलाची भूमिका बजावली. सिराजने आपल्या 4 ओव्हरमध्ये 19 धावा करुन 3 विकेट्स घेतल्या. सिराजला त्याच्या कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
सिराज मागील सात वर्षांपासून म्हणजेच 2018 ते 2024 दरम्यान आरसीबीकडून खेळला. मात्र 2025 च्या आयपीएलआधी झालेल्या महालिलावामध्ये आरसीबीने सिराजला रिटेन केलं नाही. त्याने बंगळुरुकडून 87 आयपीएलचे सामने खेळताना 83 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी 31.45 ची असून त्याची सर्वोत्तम कामगिरी 21 धावांवर चार बळी अशी राहिली आहे. या सामन्यानंतर सिराजनेही भावूक होत या घरच्या मैदानावर आरसीबीऐवजी अन्य संघाकडून खेळणं हा फारच भावनिक अनुभव होता असं म्हटलं आहे.
"मी थोडा भावूक झालो होतो. मी इथे (आरसीबीसाठी) मागील सात वर्षांपासून खेळलोय. मात्र आता माजी जर्सी लालवरुन निळी झाली आहे. थोडी नर्व्हसनेस होती. थोडा इमोशनलही झालो होतो. मात्र माझ्या हातात बॉल आल्यानंतर मी छान कामगिरी केली," असं सिराजने प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकल्यानंतर म्हटलं. सिराजने पॉवर प्लेमध्ये दमदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या आधीच्या संघातील देवदत्त पडिकल आणि फिलिप सॉल्ट या दोघांना झटपट बाद केलं. या विकेट्स घेतल्यानंतर तो या दोघांसमोर सेलिब्रेट करताना दिसला. विकेट घेतल्यानंतर सिराजने आपला आवडता फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो करतो तसं 'सुई' स्टाइल सेलीब्रेशन केलं. याबद्दलही तो सामन्यानंतर बोलला.
"मी रोनाल्डोचा चाहता असल्याने तसं सेलीब्रेशन केलं," असं सिराज म्हणाला. सिराजला चॅम्पियन्स ट्रॅफीच्या संघात स्थान मिळालं नव्हता. आता गुजरातकडून खेळतानाचा अनुभव सिराजने सांगितला. "मी सातत्याने क्रिकेट खेळत होतो. मात्र ब्रेक दरम्यान मी माझ्या चुका सुधारल्या आणि तब्बेतीसंदर्भात ठोस काम केलं," असं सिराज म्हणाला.
आशिष नेहरा आणि इशांत शर्मासारख्या दिग्गजांसोबत आता आयपीएलच्यानिमित्ताने काम करायला मिळत असल्याबद्दल सिराजने समाधान व्यक्त केलं. "मला गुजरातच्या संघाने विकत घेतल्यानंतर मी आशिष भाईंना फोन केला होता. त्यांनी मला जा आणि गोलंदाजी एन्जॉय कर असं सांगितलं. इशू भाईने मला कोणत्या लाइन आणि लेंथवर गोलंदाजी करायची हे सांगितलं. स्वत:वर विश्वास ठेवायचा आणि मग खेळपट्टी तुम्हाला मदत करते," असं सिराज म्हणाला. गुजरातचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरलाय.