Rishabh Pant Emotional Post: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याच्या धैर्य आणि जिद्दीची चर्चा सर्वत्र होत आहे. मँचेस्टर येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याने खऱ्या योद्ध्याप्रमाणे लढा दिला. प्रचंड वेदनांना तोंड देत पंत मैदानात उतरला, पण आता तो या मालिकेतून बाहेर पडलाय. सामन्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. पायाच्या फ्रॅक्चरमुळे सध्या तो कुबड्यांच्या साहाय्याने चालतोय. तरीही कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी तो उत्सुक आहे. काय म्हणाला रिषभ पंत? सविस्तर जाणून घेऊया.
भारताच्या पहिल्या डावादरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली. इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस वोक्सचा वेगनाव चेंडू त्याच्या पायावर जोरदार आदळला. ज्यामुळे रिषभच्या पायातून रक्तही आले. त्याला चालणेही कठीण झाले होते. तरीही त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला. वेदनांवर मात करत पंतने मैदानात उतरून शानदार अर्धशतकी खेळी साकारली. मात्र, दुसऱ्या डावात त्याला फलंदाजी करता आली नाही. तरीही भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
ऋषभ पंतने इंस्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. ज्यात त्याची पुनरागमनाची तीव्र इच्छा दिसून येते. तो लिहितो, "मला मिळणारे प्रेम आणि शुभेच्छा यांच्यासाठी मी मनापासून आभारी आहे. हे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्रोत ठरलंय. माझं फ्रॅक्चर बरं होतंय आणि मी हळूहळू पुनर्वसन प्रक्रियेला सुरुवात करणारेय. मी संयम राखेन, माझ्या दिनचर्येचे काटेकोरपणे पालन करेन आणि माझे शंभर टक्के देईन. देशासाठी खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे. मला आवडणारे काम पुन्हा करण्यासाठी मी आतुर आहे', असे रिषभ पंतने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
या सीरिजमध्ये ऋषभ पंत अप्रतिम फॉर्ममध्ये दिसला. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने दोन्ही डावांत शतके ठोकली. दुसऱ्या कसोटीतही त्याने अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 54 धावांची खेळी केली, तर चौथ्या सामन्यातही त्याने 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. आता शेवटच्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या जागी जगदीशनला संघात स्थान देण्यात आलंय. पंतच्या या जिद्दी खेळीने आणि भावनिक मेसेजमुळे चाहत्यांचे मन जिंकलंय. तो लवकरच मैदानात परतावा, अशी इच्छा क्रिकेटप्रेमी करत आहेत.