Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

यशस्वी जायस्वालला रोहित शर्माने दिला संदेश, पत्रकार परिषदेत केला स्वतः खुलासा; विराट आणि गंभीरचंही घेतलं नाव

Yashasvi Jaiswal Press Conference: पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक ठोकल्यानंतर यशस्वी जयस्वालने पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याला काय संदेश दिला हे सांगितले. त्याने विराट कोहली आणि गंभीरची नावंही घेतली.  

 यशस्वी जायस्वालला रोहित शर्माने दिला संदेश, पत्रकार परिषदेत केला स्वतः खुलासा; विराट आणि गंभीरचंही घेतलं नाव

IND vs ENG 5th Test: भारताच्या युवा फलंदाज यशस्वी जायस्वालने पाचव्या टेस्टच्या दुसऱ्या डावात दमदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जायस्वालने अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्या पत्रकार परिषदेत  रोहित शर्माने दिलेला 'स्पेशल मेसेज', विराट कोहलीकडून मिळालेली मदत आणि कोच गौतम गंभीरसोबतचं नातं या सगळ्याबद्दल त्याने खुलासा केला. 

जायस्वालने उभारली भारताची भक्कम आघाडी

जायस्वालच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचं मजबूत लक्ष्य ठेवलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 1 गडी गमावून 50 धावा केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर जायस्वाल पत्रकारांशी संवाद साधत होता.

ओव्हलची खेळपट्टी आव्हानात्मक

खेळपट्टीबद्दल विचारल्यावर जायस्वाल म्हणाला, "ओव्हलचं विकेट थोडं ‘स्पाइसी’ होतं, त्यामुळे फलंदाजी करताना वेगळी मजा आली. इंग्लंडमध्ये अशाच खेळपट्ट्यांची अपेक्षा असते आणि त्यासाठी मी आधीच मानसिक तयारी केली होती."

रोहित शर्माने दिला खास संदेश 

जायस्वालच्या याशतकानंतर त्याला विचारण्यात आलं की मैदानात उपस्थित असलेल्या रोहित शर्माकडून काही संदेश मिळाला का? यावर यशस्वी म्हणाला, "हो, मी रोहित भाईला पाहिलं आणि ‘हॅलो’ केलं. तेव्हा त्यांनी फक्त एवढंच सांगितलं ‘खेळत राहा’. त्यांचं तेच साधं वाक्य मला खूप मोटिवेशन देऊन गेलं." ही यशस्वीची या मालिकेतील दुसरी शतकी खेळी ठरली. पहिल्या टेस्टमध्येही त्याने 101 धावा केल्या होत्या. यंदा टीम इंडियाने एकूण 12 शतकं झळकावली आहेत. जी टेस्ट मालिकेतील भारतीय संघासाठी एक ऐतिहासिक विक्रम आहे.

गंभीरसोबतचा अनुभव 'खास'

गौतम गंभीर यांच्याबद्दल बोलताना जायस्वाल म्हणाला, "गंभीर सरांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळतं. आम्ही बर्‍याच गोष्टींवर चर्चा करतो, जसं की परिस्थितीनुसार फलंदाजीचं प्लॅनिंग, विरोधी गोलंदाजांवर दबाव कसा आणायचा. नेट्समध्येही आम्ही एकत्र मेहनत घेतली आहे. ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं खूप प्रेरणादायी ठरतं."

विराट आणि रोहित दोघांचे आभार 

जायस्वालने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. "प्रत्येक देशात खेळताना वेगवेगळ्या अडचणी असतात. भारतात स्पिन, तर इंग्लंड-ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजी. अशा परिस्थितींमध्ये प्लॅनिंग तसंच करावं लागतं. रोहित आणि विराट यांनी मला हे समजून घेत शिकवलं आहे. मी पाहिलं आहे की टेस्ट क्रिकेटसाठी ते स्वतःला कसं तयार करतात. त्यांच्याकडून मला एक अधिक चांगला क्रिकेटपटू होण्याची दिशा मिळाली आहे."

 

भारताच्या युवा क्रिकेटमध्ये जायस्वालचं हे प्रामाणिक आणि संयमी रूप टीम इंडियाच्या भविष्यासाठी आशादायक आहे. मैदानावर दमदार परफॉर्मन्स आणि मैदानाबाहेर परिपक्व विचार  या दोन्ही गोष्टी त्याच्या वाढत्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहेत.

Read More