Champions Trophy 2025 : भारताचा गोलंदाज कुलदीप यादव याला मंगळवारी भारत - ऑस्ट्रेलिया (India VS Australia) सेमी फायनल सामन्यात एकही विकेट घेणं शक्य झालं नाही. कुलदीपने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ओव्हर टाकून त्यात 44 धावा दिल्या. दरम्यान कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना एक अशी चूक केली जे पाहून मैदानात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) त्याच्यावर खूप भडकले. विराट कोहली तर बाउंड्रीवरून कुलदीपवर ओरडताना दिसला. तर रोहितने कुलदीपला चांगलंच सुनावलं. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 264 धावा करून भारताला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत - ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामन्यात आमने सामने आले होते. ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली खरी पण भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला होता. ट्रेव्हिस हेड आणि कूपर यांच्या स्वस्तात विकेट गेल्यावर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि लोबूशेन या दोघांनी मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघे काही प्रमाणात त्यात यशस्वी सुद्धा झाले आणि त्यांनी अर्धशतकीय भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 100 पार पोहोचवला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 96 बॉलवर 73 धावा ठोकल्या. स्टीव्ह स्मिथ हा भारतासाठी धोकादायक ठरू लागला होता. यावेळी कुलदीप यादव 32 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. ओव्हरचा पाचवा बॉल हा स्मिथने डीप मिडविकेटवर फ्लिक केला. त्यानंतर स्मिथने वेगाने धावत एक धाव घेतली. दरम्यान विराट कोहलीने त्याच्याकडे आलेला बॉल कुलदीपचाय नॉन स्ट्राइक एंडवर थ्रो केला. पण ढिलेपणामुळे कुलदीप हा बॉल पकडू शकला नाही आणि बॉल उडून रोहितकडे गेला. जर कुलदीपने बॉल पकडला असता आणि वेळेत स्टंपिंग केली असती तर स्टीव्ह स्मिथ बाद झाला असता.
अटीतटीच्या सामन्यात कुलदीप यादवचा ढिलेपणा पाहून विराट रागाने लाल झाला. तो बाउंड्रीवरून कुलदीपला ओरडताना आणि त्याला शिव्या घालताना दिसला. तर दुसरीकडे कर्णधार रोहित सुद्धा कुलदीपवर भडकला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून यावर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. कुलदीप यादवचा आयसीसी वनडे स्पर्धेतील रेकॉर्ड खराब आहे. त्याने 28 ओव्हर गोलंदाजी करून 156 धावा केल्या असून त्यात केवळ एक विकेट घेणं त्याला शक्य झालं आहे.
हेही वाचा : रवींद्र जडेजाने लाबुशेनला रन घेण्यापासून रोखलं, ICC चा नियम मोडला, टीम इंडियाला मिळणार शिक्षा?
ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये पराभूत केल्यामुळे भारत आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. 9 मार्च रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना दुबईत खेळवला जाणार आहे. 5 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना खेळवला जाणार असून यात विजयी होणारा संघ भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळेल.