Female Fan's Emotional Breakdown After Rohit's Retirement: भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माने बुधवारी (७ मे रोजी) तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याच्या या अचानक केलेल्या घोषणेमुळे देशभरातील चाहते नाराज झाले आहेत. रोहितचा हा निर्णय अनपेक्षित होता. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत रोहित भारताचे नेतृत्व करेल अशी जोरदार चर्चा सुरू असताना. त्याच्या अचानक झालेल्या घोषणेमुळे क्रिकेट जगतात धक्का बसला. रोहितच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. एका चाहतीचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
३८ वर्षीय रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर भावनिक स्टोरी टाकून चाहत्यांना याची माहिती दिली.
त्याच्या कसोटी कॅपचा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की,
'सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत राहीन'.
घोषणा झाल्यानंतर काही वेळातच, रोहितच्या चाहत्यांचा प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातीलच एक चाहती म्हणजे जिनिया देबनाथ ही तरुण मुलगी. या चाहतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिया रडताना आणि अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. तिच्या या रडण्याचे कारण विचारल्यावर , ती म्हणाली, "रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे."
हा व्हिडीओ काही काळातच व्हायरल झाला. रोहितच्या इतर चाहत्यांनी तिला भरपूर प्रेम दिले. एका युजरने लिहिले, "मला रोहित शर्माची आठवण येईल," हे लाखो क्रिकेटप्रेमींच्या मनःस्थितीचे प्रतिबिंब आहे.
टीम इंडियाचा टेस्ट संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माची कारकीर्द अतिशय उत्तम ठरली. त्याने 67 टेस्ट सामने खेळताना 4302 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 अर्धशतकं, 12 शतकं तर 1 द्विशतक सुद्धा लगावलं. या दरम्यान त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. 2013 रोजी इडन गार्डन स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याचा शेवटचा टेस्ट सामना त्याने 26 डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान खेळला.