Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'भारतीय संघ पाकिस्तानात खेळला असता तर...'; 'दुबईत खेळले' टीकेवरुन अक्रम स्पष्टच बोलला

CT 2025 Team India: भारतीय संघाने एकही सामना न गमावता चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली. मात्र आता यावरुन टीका होत असतानाच वसीम अक्रमने सडेतोड उत्तर दिलं आहे.

'भारतीय संघ पाकिस्तानात खेळला असता तर...'; 'दुबईत खेळले' टीकेवरुन अक्रम स्पष्टच बोलला

CT 2025 Team India: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने नुकत्याच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघासंदर्भात मोठं विधान केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये आपले सर्व सामने दुबईच्या मैदानात खेळल्याने त्यांना स्पर्धा जिंकणं सोपं झाल्याची ओरड सध्या केली जात आहे. मात्र अशी टीका करणाऱ्यांना आता वसीम अक्रमने खडे बोल सुनावलेत.

भारत फक्त दुबईमध्ये खेळला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि भारत सरकारने भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि बीसीसीआयने हायब्रीड मोडीनुसार भारताचे सर्व सामने दुबईच्या मैदानात होतील असं निश्चित केलं. तसेच भारत उपांत्य किंवा अंतिम सामन्यात पोहचला तर ते सुद्धा दुबईमध्ये होतील असं निश्चित करण्यात आलं. मात्र मालिका पुढे सरकली त्याप्रमाणे अनेक माजी क्रिकेटपटू, खेळाडू, क्रिकेटच्या जाणकारांनी भारतीय संघ एकाच मैदानात खेळत असल्याने त्यांना झुकता कल मिळत असल्याचं म्हटलं. एकाच मैदानावर खेळायचं असल्याने इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाचा फारसा प्रवास झाला नाही. त्यामुळे त्यांची दगदग अथवा दमछाक झाली नाही. तसेच खेळपट्टीची कल्पना असल्याने भारताला झुकतं माप मिळाल्याचा आरोप करण्यात आला. 

वसीम अक्रमचे कठोर शब्दांमध्ये उत्तर

भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाला 4 विकेट्सने पराभूत करत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चषकावर नाव कोरलं. अपराजित राहून भारताने हा चषक जिंकला हे विशेष. मात्र वारंवार एकाच मैदानात खेळण्यावरुन करण्यात आलेल्या टीकेला वसीम अक्रमने कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. भारतीय संघ फक्त दुबईमध्ये सामने खेळला नसता आणि जगातल्या कोणत्याही मैदानांवर अगदी पाकिस्तानमध्येही खेळला असता तरी यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांनीच जिंकली असती असं वसीम अक्रम म्हणाला आहे. 

भारत कोणत्या दर्जाचं क्रिकेट खेळतो हे...

"हा भारतीय संघ जगात कुठेही खेळला असता तरी स्पर्धा जिंकलाच असता," असं वसीम अक्रमने म्हटलं आहे. ड्रेसिंग रुम या कार्यक्रमात बोलताना वसीम अक्रमने, "याबद्दल अनेक चर्चा झाल्या. मात्र भारतीय संघ दुबईमध्येच सर्व सामने खेळेल हे सर्वानुमते ठरवण्यात आलेलं. तसेच भारतीय संघ पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळला असता तरी जिंकलाच असता. ते 2024 चा टी-20 वर्ल्ड कप एकही सामना न गमावता जिंकले. ते चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धाही एकही सामना न गमावता जिंकले. यावरुनच ते कोणत्या दर्जाचं क्रिकेट खेळतात हे दिसून येतं. यावरुनच नेतृत्व काय असतं हे समजतं," अशा शब्दांमध्ये वसीम अक्रमने भारतीय संघाची बाजू घेत कौतुक केलं आहे.

बीसीसीआयचं कौतुक

वसीम अक्रमने बीसीसीआयने रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीरवर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचंही कौतुक केलं आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिका गमावल्यानंतरही रोहित आणि गंभीरवर विश्वास ठेवणं हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचं वसीम अक्रम म्हणालाय.

Read More