BCCI To Take Big Decision: एकीकडे इंडियन प्रिमिअर लीग स्पर्धेला सुरुवात झालेली असतानाच दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ एका मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या निवृत्तीची ही तयारी असल्याचं बोललं जात आहे. खरं तर रोहित आणि विराट या दोघांनाही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आपण काही लवकर निवृत्त होत नाही असं सूचक विधान केलं होतं. मात्र आता बीसीसीआयच या दोघांच्या निरोपाची तयारी करत असल्याची जोरदार चर्चा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमुळे आहे. मागील वर्षी या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वगळण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यंदा याच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये अधिक चर्चेत राहतील असे मोठे निर्णय घेतले जातील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
'दैनिक जागर'ने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये यंदा मोठे बदल अपेक्षित आहेत. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव देवजित साकिया हे 29 मार्च रोजी गुवहाटीमध्ये भेटणार आहेत. या भेटीमध्ये आयपीएलनंतर जून महिन्यात इंग्लडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या भारतीय संघासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार आहे. दुसरीकडे पुरुषांच्या संघाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टसंदर्भातही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात असतानाच हा निर्णय घेताना समभागधारकांनाही विश्वासात घेतलं जाणार आहे. मागील आठवड्यामध्येच महिलांच्या संघाचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट झाले.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टसंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असतानाच या निर्णयामध्ये अनेक बड्या नावांचाही निकालही या माध्यमातून लागणार आहे. थेट रोहित शर्मा आणि विराटचं नाव घेतलं जात नसलं तरी या दोघांबरोबरच अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला यंदाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून डिमोट केलं जाईल अशी दाट शक्यता आहे. सध्या रोहित, विराट आणि जडेजा हे बीसीसीआयच्या ए प्लस कॅटेगरीमधील खेळाडू आहेत. सर्व फॉरमॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आघाडीच्या खेळाडूंचा या कॅटेगरमध्ये समावेश असतो.
आता विराट, रोहित आणि जडेजा हे अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळेच त्यांना डिमोट करुन ए कॅटेगरीमध्ये टाकलं जाईल असं सांगण्यात येत आहे. हे तिघेही टप्प्याटप्प्यात निवृत्ती घेत एक एका फॉरमॅटमधून बाहेर पडतील असं सांगितलं जात असून बीसीसीआयही आर्थिक बाबतीत या तिघांच्या निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माच इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये कर्णधार असेल हे ही निश्चित झालेलं नाही. जसप्रीत बुमहारच्या प्रकृतीसंदर्भातील समस्या हा निवड समितीसमोरील मोठा प्रश्न आहे. बुमराहकडे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवावी की याबद्दल संभ्रम कायम असल्याचं सांगितलं जात आहे.