Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'या काकांच्या नादी लागू नको', संजीव गोयंकांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा वैभव सुर्यवंशीला सल्ला!

Vaibhav Surywanshi: एलएसजी मालक गोयंका यांनी वैभव सुर्यवंशीचा जुना फोटो शेअर केलाय. 

'या काकांच्या नादी लागू नको', संजीव गोयंकांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा वैभव सुर्यवंशीला सल्ला!

Vaibhav Surywanshi: 14 वर्षीय वैभव सुर्यवंशी सध्या क्रिकेट विश्वात चर्चा आणि कौतुकाचा विषय ठरलाय. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलकडून खेळताना त्याने 35 चेंडूक शतक ठोकले आणि साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. भल्याभल्या बॉलर्सनाही वैभवला कोणत्या टप्प्यात चेंडू टाकावा हे कळत नव्हतं. अशा हरहुन्नरी वैभवबद्दलच्या बऱ्याच गोष्टींची चर्चा सध्या होतेय. दरम्यान एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत आयपीएल पाहायला आलाय. आज या मुलाचे जगभरातून कौतुक होतंय.  राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय प्रतिभावान खेळाडू वैभव सूर्यवंशी आयपीएल आणि टी 20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी 2017 मध्ये 6 वर्षीय वैभवचा त्याच्या तत्कालीन संघ रायझिंग पुणे सुपरजायंट्सला सपोर्ट करतानाचा फोटो शेअर केलाय. यावर नेटकरी वैभव सुर्यवंशीला मजेशीर सल्ला देतायत.  

वैभव सुर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. भारतीय खेळाडूने केलेले सर्वात जलद आणि आयपीएलमधील दुसरे सर्वात जलद शतक ठरले. हा सूर्यवंशीचा एकमेव तिसरा आयपीएल सामना होता. 14 वर्षे आणि 32 दिवसांच्या वयात त्याने फक्त 38 चेंडूत 101 धावा काढल्या आणि आयपीएल आणि टी20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. फक्त 35 चेंडूत झळकलेले त्याचे शतक 2013 च्या क्रिस गेलच्या ऐतिहासिक खेळीपेक्षा फक्त 5 चेंडूंनी कमी होते.

दरम्यान एलएसजी मालक गोयंका यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडियावरुन, 2017 ला 6 वर्षाचा असतानाचा वैभवचा एक फोटो शेअर केला. त्यावेळी वैभव रायझिंग पुणे सुपरजायंटला सपोर्ट करत होता.  

काय म्हणाले गोएंका?

'काल रात्री मी थक्क होऊन पाहिले. आज सकाळी मला 2017 मध्ये माझ्या तत्कालीन संघ, रायझिंग पुणे सुपरजायंटला चीअर करताना 6 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा हा फोटो दिसला. धन्यवाद, वैभव. खूप खूप शुभेच्छा आणि पाठिंबा,' असे गोयंकांनी कॅप्शनमध्ये लिहिले. वैभव सूर्यवंशीच्या 35 चेंडूंच्या शतकामुळे आरआरने जीटीविरुद्ध 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला. घरच्या टीमने 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करणारा सर्वात जलद संघ बनला. त्यांनी 15.5 षटकांत 210 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. सामन्यानंतर गोयंका यांनी वैभवच्या कामगिरीचे कौतुक केले. 'उत्साह, आत्मविश्वास, प्रतिभेला सलाम... तरुण वैभव सूर्यवंशी... व्वा! 35 चेंडूत एक शानदार शतक...',अशी पोस्ट त्यांनी एक्सवरुन केलीय. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

संजीव गोयंकांच्या पोस्टवर नेटकरी विविध मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण रिषभ पंतला रिप्लेस करुन वैभव सुर्यवंशीला घ्या, असा सल्ला देतायत. तर दुसऱ्याने, 'या काकांच्या नादी लागू नको. ते तुला खूप रक्कम देतील. सुरुवातीला गोड बोलतील. पण मग नंतर वाट लावतील', अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी वैभव तुमच्यासाठी आला नव्हता तर एमएस धोनीला सपोर्ट करण्यासाठी आला होता, अशी प्रतिक्रियाही एकाने दिली आहे.

Read More