New ICC CEO Sanjog Gupta: जय शाह यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदावर नियुक्तीनंतर जागतिक क्रिकेटवर भारताचा प्रभाव पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आहे. आता आयसीसीच्या सीईओ (CEO) पदावर देखील एका भारतीयाची निवड झाली आहे. आता संजोग गुप्ता हे आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. याबद्दल जय शहा यांनी माहिती दिली आहे. संजोग गुप्ता हे 7 जुलै 2025 पासून पदभार स्वीकारतील. त्यांनी ज्योफ एलार्डाइस यांची जागा घेतली असून, ICC चे सातवे CEO म्हणून ते कार्यभार सांभाळतील. मीडिया, स्पोर्ट्स आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांचा दोन दशकांहून अधिकचा अनुभव असून ते आयसीसीला नव्या दिशेने नेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या संजोग गुप्ता हे जिओस्टार स्पोर्ट्स अँड लाइव्ह एक्सपीरियन्सचे सीईओ (CEO) आहेत. त्यांनी भारतीय स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये अनेक महत्त्वाचे प्रयोग करत बदल घडवून आणले आहेत. डिजिटल युगात प्रेक्षकांची मानसिकता समजून घेत, फ्रँचायझी आधारित स्पोर्ट्स मॉडेल्स आणि मल्टीलँग्वेज कव्हरेजचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
संजोग गुप्ता यांनी करिअरची सुरुवात पत्रकारितेतून केली. 2010 मध्ये स्टार इंडिया (आताचे जिओस्टार) या कंपनीत प्रवेश केला आणि तिथे कंटेंट, स्ट्रॅटेजी व प्रोग्रामिंग यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. 2020 मध्ये ते डिज्नी स्टार स्पोर्ट्सचे हेड बनले. त्यांच्या नेतृत्वात डिजिटल-फर्स्ट स्ट्रॅटेजी, महिलांसाठी स्वतंत्र स्पोर्ट्स कव्हरेज आणि स्थानिक भाषांतील ब्रॉडकास्ट यशस्वी ठरले. 2024 मध्ये वायकॉम18 आणि डिज्नी स्टारच्या विलयनानंतर, त्यांची सीईओ (CEO) म्हणून जिओस्टारमध्ये नियुक्ती झाली.
जय शाह यांनी संजोग गुप्तांच्या निवडीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की,“ICC च्या CEO पदासाठी संजोग गुप्ता यांची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. क्रिकेटच्या जागतिक विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा होईल. क्रिकेट, मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या संगमातून संजोग एक नवी दिशा देऊ शकतात. क्रिकेटला जागतिक पातळीवर, अगदी ऑलिंपिकसारख्या मंचांवर स्थायिक करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल.”
ICC ने मार्च 2025 मध्ये CEO पदासाठी जागतिक पातळीवर भरती प्रक्रिया सुरू केली होती. तब्बल 25 देशांमधून 2500 हून अधिक अर्ज आले होते. त्यातून 12 जणांची शॉर्टलिस्टिंग करण्यात आली. त्यांची नावं ICC डिप्टी चेअर इमरान ख्वाजा, इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे रिचर्ड थॉम्पसन, श्रीलंकेचे शम्मी सिल्वा आणि BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांच्या समितीकडे पाठवण्यात आली. या समितीने एकमताने संजोग गुप्तांच्या नावाची शिफारस केली, जी ICC च्या संपूर्ण बोर्डाने मान्य केली.
CEO म्हणून निवड झाल्यावर संजोग गुप्ता यांनी सांगितले, “क्रिकेट जगतातील या ऐतिहासिक टप्प्यावर मला ही जबाबदारी मिळाल्याचा मला अभिमान आहे. 2 अब्ज चाहत्यांचा पाठिंबा लाभलेल्या या खेळाचे प्रतिनिधित्व करणे ही मोठी जबाबदारी आहे. क्रिकेटचा विस्तार, महिला क्रिकेटचा वाढता प्रभाव, तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि नव्या प्रेक्षक वर्गाशी जोडण्याचे प्रयत्न हे सर्व मिळून ICC च्या पुढच्या पर्वाची दिशा ठरवतील.”