IND VS ENG : शनिवार 24 मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने 18 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली असून यात अनेक नव्या आणि अनुभवी खेळाडूंना संधी मिळाली. रोहित शर्मानंतर शुभमन गिल हा भारतीय टेस्ट संघाचा नवा कर्णधार झाला तर ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले. मात्र या दरम्यान आगामी इंग्लंड सिरीजसाठी 6 आठवड्यात तब्बल 10 किलो वजन कमी करून आपल्या फिटनेस आणि परफॉर्मन्सवर मेहनत घेणाऱ्या एका मुंबईकर खेळाडूला मात्र टीम इंडियात संधी मिळाली नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील गोष्टी लीक केल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही असं म्हटलं जातंय.
नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. तेथे त्यांनी ऑस्ट्रेयीया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी सिरीजमध्ये एकूण 5 सामने खेळले. त्यात भारताला 3-1 या फरकाने लाजिरवाण्या पराभवाला समोर जावं लागलं. यापूर्वी भारतात झालेली न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज सुद्धा भारताने 3-0 ने गमावली होती. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा ढासळलेल्या परफॉर्मन्समुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण सुद्धा फार बरं नसून हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याच मतभेदांच्या कारणास्थव रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात खेळला नाही अशी माहिती आहे.
हेही वाचा : सर्वांचा विरोध डावलून शुभमन गिलला का केलं टेस्ट कॅप्टन? अजित आगरकरने दिलं मोठं कारण
बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान ड्रेसिंग रूममधील बातम्या बाहेर मीडियामध्ये लीक केल्याने गंभीरने काही खेळाडूंना फटकारलं होतं. त्यानंतर सरफराज खानवर मीडियामध्ये बातम्या लीक करत असल्याचा आरोप झाला. पण बोर्डाने यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यानंतर सरफराज खानचा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा समावेश करण्यात आला.
सरफराज खान हा मूळचा मुंबईचा राहणारा असून तो मुंबई संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आगामी इंग्लंड दौरा डोळ्यासमोर ठेऊन 27 वर्षांच्या सरफराज खानने आपल्या फिटनेसवर काम केलं. त्याने आठवड्यात तब्बल 10 किलो वजन कमी केलं. मात्र इंग्लंड दौऱ्यात बीसीसीआयने जाहीर केलेल्या 18 खेळाडूंच्या संघात सरफराज खानला स्थान देण्यात आलं नाही. सरफराज खानने 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सरफराजने आतापर्यंत 6 टेस्ट सामने खेळले असून यात 371 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.