Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रामनवमीमुळे IPL 2025 चं वेळापत्रक बदलणार; पोलिसांनी हात वर केल्याने नवा गोंधळ

IPL 2025 Rescheduled: इंडियन प्रिमिअर लीगची सुरुवात 22 मार्चपासून सुरु होत आहे. मात्र त्यापूर्वीच या स्पर्धेच्या नियोजनामध्ये एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे.

रामनवमीमुळे IPL 2025 चं वेळापत्रक बदलणार; पोलिसांनी हात वर केल्याने नवा गोंधळ

IPL 2025 Rescheduled: कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगमधील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना घरच्या मैदानावर खेळता येणार नाही अशी दाट शक्यता आहे. 6 एप्रिल रोजी होणारा ईडन गार्डन्सवरील सामना रिशेड्यूल केला जाईल अशी दाट शक्यता आहे. कोलकाता पोलिसांनी राम नवमीच्या पार्श्वभूमीवर 6 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मिरवणुकींच्या पार्श्वभूमीवर अद्याप परवानगी दिलेली नसल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांबरोबर झाली विशेष बैठक

पश्चिम बंगालामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमधील राजकीय संघर्ष जगजाहीर आहे. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनिमित्त 20 हजार मिरवणुका आयोजित केल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. म्हणूनच बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहशीश गांगुली यांनी कोलकाता पोलिसांबरोबर मंगळवारी दोन बैठका घेतल्या. या बैठकीनंतर पोलिसांनी अद्याप 6 तारखेच्या सामन्यासाठी परवानगी दिलेली नसल्याचं गांगुली यांनी स्पष्ट केलं. "आम्हाला या सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांचं संरक्षण नसेल तर 65 हजार प्रेक्षकांना हाताळणं कठीण होईल," असं गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआयली दिली कल्पना

"आम्ही बीसीसीआयला यासंदर्भात कळवलं आहे. याबद्दल अंतिम निर्णय घेण्यासाठी अजूनही कालावधी हाती आहे. मागील वर्षीही राम नवमीच्या दिवशी असलेल्या आयपीएलच्या सामन्यामध्ये फेरबदल करण्यात आलेला," असंही गांगुली यांनी सांगितलं. कोलकात्यामध्ये केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या संघांच्या सामन्याबद्दल विशेष उत्सुकता दिसून येत आहे. लखनऊचे मालक संजीव गोयंका कनेक्शनमुळे दोन्ही संघांना समान पाठिंबा असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र आता हा सामनाच दुसरीकडे हलवला जाण्याची शक्यता असल्याने चाहत्यांची हिरमोड होण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षीही असाच बदल केलेला

रामनवमीच्या दिवशी मागील वर्षीच्या वेळापत्रकातील केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना दुसरीकडे हलवण्यात आलेला. अशीच स्थिती आता यंदाच्या केकेआर विरुद्ध लखनऊ सामन्याची आहे. आता बीसीसीआय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोलकात्यातच ओपनिंग सेरिमनी

यंदाच्या आयपीएलची सुरुवात 22 मार्च रोजी ईडन गार्डन्सवरच होत आहे. केकेआरचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध पहिला सामना याच मैदानावर खेळणार आहे. आयपीएलची ओपनिंग सेरिमनी याच दिवशी पार पडणार असून 35 मिनिटांच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये गायिका श्रेया घोषाल आणि अभिनेत्री दिशा पटाणी यांचे विशेष परफॉर्मन्स असणार आहेत. या सोहळ्याला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

Read More