India pull out of WCL Match Against Pakistan: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अचानक रद्द झाल्यानंतर, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे. एजबॅस्टनमध्ये रविवारी होणाऱ्या या सामन्याला सुरुवात होण्याआधीच भारतीय खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे आयोजकांना सामना रद्द करण्याची घोषणा करावी लागली. पाहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
युवराज सिंग, सुरेश रैना, हरभजन सिंग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यासह अनेक खेळाडूंनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावर अधिकृत काही निवेदन आले नसले तरी भारताचा माजी फलंदाज शिखर धवनने सोशल मीडियावर एक मेल शेअर करत आयोजकांना दिलेल्या निर्णयाची माहिती दिली होती.
हे ही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रद्द! मॅच खेळायला खेळाडूंचा नकार
माध्यमांशी बोलताना शाहिद आफ्रिदीने भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला. तो म्हणाला, "मी नेहमी म्हणतो की क्रिकेटला राजकारणापासून वेगळं ठेवलं पाहिजे. खेळाडूंनी चांगला दूत म्हणून वागलं पाहिजे, देशासाठी लाजिरवाणी गोष्ट बनू नये." पुढे आफ्रिदी म्हणाला, "जर भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध खेळायचं नसेल, तर त्यांनी आधीच स्पष्ट सांगायला हवं होतं. तुम्ही इथे आलात, सराव सत्रं घेतली आणि नंतर अचानक असा निर्णय घेतलात, हे योग्य नाही. खेळ लोकांना जवळ आणतो. जर प्रत्येक गोष्टीत राजकारण आणलं, तर आपण कसं पुढे जाणार? चर्चा केल्याशिवाय कोणतीच गोष्ट सुटत नाही. संवाद टाळल्याने परिस्थिती अधिकच बिघडते."
हे ही वाचा: Arshad Nadeem: अर्शद नदीम कडून पाकिस्तानला घरचा आहेर, खोट्या आश्वासनाची केली पोलखोल!
आफ्रिदीने स्पष्ट केलं की ते खेळायला आले आहेत, मैत्रीपूर्ण वातावरणात संवाद साधण्यासाठी आले आहेत, पण काही वेळा "एक खराब व्यक्ती सगळ्यांना बदनाम करते," असा टोलाही त्यांनी लगावला.
काही मीडिया अहवालांमध्ये असं म्हटलं जातंय की भारतीय खेळाडूंनी आफ्रिदीच्या उपस्थितीवरही नाराजी व्यक्त केली होती. पाहलगाम हल्ल्यानंतर आफ्रिदीने भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं, ज्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात संताप उसळला होता. यावर प्रतिक्रिया देताना आफ्रिदी म्हणाला,
"जर माझ्यामुळे सामना रद्द होत असेल, तर मी ग्राउंडवरही आलो नसतो. पण क्रिकेट थांबू नये. क्रिकेटसमोर शाहिद आफ्रिदी काय आहे? काहीच नाही."
हे ही वाचा: विराट कोहली पुन्हा टेस्ट मैदानात उतरणार? निवृत्तीचा निर्णय मागे घेत टीम इंडियाच्या मदतीला येणार धाऊन?
या सगळ्या प्रकरणामुळे भारत-पाक क्रिकेट संबंधांवर पुन्हा एकदा राजकारणाचे सावट दिसून येत आहे. खेळाच्या मैदानावर राजकारण नको, असं म्हणत आफ्रिदीने या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली.