Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर शोएब अख्तरने नाक खुपसलं

भारताने जम्मू-काश्मीरमधलं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर शोएब अख्तरने नाक खुपसलं

मुंबई : भारताने जम्मू-काश्मीरमधलं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनेही नाक खुपसलं आहे. शोएब अख्तर याने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही तुमच्या बाजूने उभे आहोत, ईद मुबारक' असं ट्विट शोएब अख्तरने केलं आहे.

शोएब अख्तरने या ट्विटसोबत एका डोळ्याला पांढरी पट्टी लावलेल्या एका लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरही एक संदेश लिहिण्यात आला आहे. 'बलिदान म्हणजे काय हे तूला पाहून समजतं. तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना. जगण्यासाठीचा महान उद्देश #Kashmir 'असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.

याआधी पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीही काश्मीरच्या मुद्द्यावर बरळले होते. 'संपूर्ण पाकिस्तान काश्मीरच्या आमच्या बंधूंसोबत आहे. या कठीण काळात अल्लाहने काश्मिरींचा बचाव करावा, अशी प्रार्थना मी करतो,' असं सरफराज बकरी ईदच्या नमाजनंतर म्हणाला. काश्मिरी जनतेएवढचं दु:ख आणि यातना आम्हालाही झाल्या आहेत. संपूर्ण पाकिस्तान काश्मीरच्या जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया सरफराजने दिली.

याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीही काश्मीरच्या मुद्द्यावरून बरळला होता. 'संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार काश्मिरींना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? काश्मीरमध्ये होत असलेलं आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे,' असं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं. आफ्रिदीने त्याच्या ट्विटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही टॅग केलं.

Read More