T20 Mumbai League : आयपीएल 2025 मध्ये श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वात पंजाब किंग्सला (Punjab Kings) फायनलमध्ये पोहोचवले. मात्र आरसीबीकडून पराभूत झाल्याने पंजाब किंग्सला आयपीएलची विजेती ट्रॉफी उंचावता आली नाही. आता पुन्हा एकदा श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) त्याच्या नेतृत्वातील संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आहे. सध्या टी20 मुंबई लीग सुरु आहे. श्रेयस अय्यर हा सोबो मुंबई फाल्कंसचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याचा संघ लागोपाठ चांगली कामगिरी करत असून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांचा सामना फायनलमध्ये साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स सोबत होणार असून या संघाचं नेतृत्व रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांचा मुलगा सिद्धेश लाड करत आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सचा संघ क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवून आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये पोहोचला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवून पंजाब किंग्सचं पहिल्यांदा ट्रॉफी विजयाचं स्वप्न मोडलं होतं. आयपीएल फायनल संपून काहीच दिवसांनी टी20 मुंबई लीगला सुरुवात झाली असून श्रेयस अय्यरने सोबो मुंबई फाल्कंस संघाचं कर्णधारपद स्वीकारलं. त्याने संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आहे. 12 जून रोजी साउथ सेंट्रल मराठा विरुद्ध सोबो मुंबई फाल्कंस या संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होईल.
टी20 मुंबई लीगच्या सेमी फायनलमध्ये श्रेयस अय्यरचा संघ सोबो मुंबई फाल्कंसने बांद्रा ब्लास्टर्सला 14.4 ओव्हरमध्ये 5 विकेटने हरवलं होतं. बांद्रा ब्लास्टर्सने २० ओव्हरमध्ये 130 धावा त्यांनी केल्या होत्या. ध्रुमिल मतकरने यात सर्वाधिक 34 धावा केल्या होत्या. तर कर्णधार आकाश आनंद 31 धावा केल्या होत्या. मुंबई फाल्कंससाठी आकाश पराकरने दोन ओव्हरमध्ये 16 धावा खर्च करून 3 विकेट आपल्या नावावर केल्या. यश आणि विनायकने सुद्धा प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वात तीन वेगवेगळ्या संघांना फायनलपर्यंत पोहोचवले आहे. यात दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सचा सुद्धा समावेश आहे. तर यात कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 2024 मध्ये आयपीएलचं विजेतेपद सुद्धा मिळवलं आहे.