अँडरसन-तेंडुलकर मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलने आकाशदीच्या गोलंदाजीचं कौतुक केलं आहे. भारताने 336 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत शुभमन गिलने आकाशदीपने चौथ्या दिवशी बेन डकेट आणि जो रुट यांना बाद करत केलेल्या जबरदस्त गोलंदाजीचं कौतुक केलं. "मला वाटलं होतं त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद करणं सोपं जाणार नाही," असं गिल म्हणाला.
पुढे त्याने सांगितलं की, ""आकाशदीपने ज्या पद्धतीने त्या दोन विकेट घेतल्या, त्यामुळे सर्वांना आत्मविश्वास मिळाला की आपण हा कसोटी सामना जिंकू शकतो. सकाळी जेव्हा तो चेंडू सीम होत होता, त्यामुळेच सर्व खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की, हो, आपण ते करू शकतो".
आकाश दीपने 187 धावांमध्ये 10 विकेट घेत (4/88 आणि 6/99) जबरदस्त पुनरागमन केलं आणि इंग्लंडमधील कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या सर्वोत्तम गोलंदाजीचा चेतन शर्माचा दीर्घकाळचा विक्रम (10/188) मोडला.
भारतासाठी फायद्याची ठरलेली आणखी एक रणनिती म्हणजे, कुलदीप यादवऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड करणं ठरलं. सामन्यापूर्वी घेतलेल्या या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. गिलने या निर्णयावरही भाष्य केलं आणि या परिस्थितीत फलंदाजी आणि नियंत्रणाची गरज अधोरेखित केली.
"कुलदीप यादवसारखा गोलंदाज असताना त्याला खेळवण्याची लालसा होणं साहिजक आहे. मात्र त्याच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यामागे फलंदाजीची व्याप्ती होती," असं गिल म्हणाला आहे. "पहिल्या डावात, मला वाटतं की माझ्या आणि वॉशिंग्टनमधील भागीदारी महत्त्वाची ठरली. जर ती भागीदारी नसती तर आमची आघाडी 70 ते 90 धावांची असती, जी मानसिकदृष्ट्या १८० धावांपेक्षा खूप वेगळी आहे," असंही त्याने अधोरेखित केलं.
पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरने 42 धावांचं योगदान दिलं आणि नंतर दुसऱ्या डावात बेन स्टोक्सला बाद केलं, ज्यामुळे त्याच्या अष्टपैलू खेळीवर छाप पडली. गिलने फिंगर स्पिनर निवडण्यामागील संघाची रणनीती सविस्तरपणे सांगितली.
"पाचव्या दिवशीही चेंडू मधोमध फारसा हलत नव्हता, तो फक्त खडबडीत ठिकाणी फिरत होता. आम्हाला वाटलं की जर आमची पहिली फलंदाजी आली तर कदाचित पाचव्या दिवशीच्या विकेटवर, जर चेंडू विकेटवरून हलत असेल तर फिंगर स्पिनर आम्हाला अधिक नियंत्रण देईल आणि विशेषतः अशा विकेटवर, कधीकधी वेगवान गोलंदाजीपेक्षा फिरकी तुम्हाला अधिक नियंत्रण देते," असं गिलने स्पष्ट केलं.
लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्याकडे पाहता, भारतीय कर्णधार गोलंदाजी कॉम्बिनेशन पुनर्मूल्यांकन करण्यास तयार होता. "तर आमची मानसिकता अशी होती, पण आता ते लॉर्ड्सवर कोणत्या प्रकारची खेळपट्टी देतात ते पाहू," असं तो पुढे म्हणाला.