Shubman Gill on fight with Zak Crawley : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान खेळ जितका रंगला, तितकीच चर्चा मैदानावरील एक वादग्रस्त प्रसंगामुळे झाली. टीम इंडियाचा युवा कप्तान शुभमन गिल आणि इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली यांच्यात रंगलेल्या शाब्दिक चकमकीने वातावरण चांगलंच तापलं. चौथ्या कसोटीपूर्वी गिलने या वादामागची कारणं स्पष्ट करत इंग्लंडवर थेट ‘खेळाची भावना भंग करण्याचा’ गंभीर आरोप केला आहे.
प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना शुभमन गिल म्हणाला, “फलंदाजी सुरु करण्यासाठी इंग्लिश फलंदाजांना 7 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. पण ते 90 सेकंद उशिरा मैदानात आले. ही गोष्ट एखाद्या संघाची रणनीती असू शकते, पण त्याचेही मॅनर्स असतो. 10-20 सेकंद नव्हे, पूर्ण 90 सेकंद उशीर झाला.” गिलच्या म्हणण्यानुसार, फक्त सुरुवातीच्या वेळेवरच नव्हे, तर फलंदाजीदरम्यानही इंग्लंडकडून वेळेचा अपव्यय करण्यात आला. यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यामुळेच झॅक क्रॉली आणि गिल यांच्यात वाद झाला.
गिल म्हणाला, “जर आम्ही त्यांच्या जागी असतो, तर आम्हीही काहीस तसाच प्लॅन केला असता. पण त्यातही एक मर्यादा असते. आम्हाला भांडण किंवा वाद घालायचा उद्देश नव्हता, पण काही वेळा भावना अनावर होतात.” गिलच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटमधील ‘स्पोर्ट्समॅनशिप’ आणि नैतिकतेवर चर्चा सुरु झाली आहे. क्रिकेटला 'जेंटलमन्स गेम' म्हटलं जातं, पण जर मुद्दाम वेळ घालवणं आणि मानसिक खेळ खेळणं रणनीतीचा भाग होत असेल, तर ही बाब चिंतेची नक्कीच आहे.
"They were 90 seconds late to come to the pitch. Not 10, not 20, 90 seconds late"
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 22, 2025
Shubman GIll questions whether England's conduct on the third evening at Lord's was against the spirit of the game pic.twitter.com/uCnsqCXDyP
शुभमन गिलच्या या वक्तव्यानंतर भारत-इंग्लंड मालिकेचं वातावरण केवळ स्कोअरबोर्डपुरतं राहिलेलं नाही. आता हा सामना सगळ्याच पातळीवर लढला जात आहे. पुढच्या कसोटीत दोन्ही संघ कशा प्रकारे यावर प्रतिक्रिया देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.