Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

एक वर्षाची बंदी तरी स्मिथ-वॉर्नरला करावं लागणार हे काम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

एक वर्षाची बंदी तरी स्मिथ-वॉर्नरला करावं लागणार हे काम

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर कॅमरून बँक्रॉफ्टचं ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. या तिघांचं निलंबन झालेलं असलं तरी त्यांना क्लब क्रिकेट खेळता येणार आहे.

तिघांनाही करावं लागणार हे काम

स्मिथ, वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट यांना १०० तासांचं सामाजिक कामही करावं लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या कम्युनिटी क्रिकेटमध्ये या तिघांना १०० तास स्वेच्छेनं काम करावं लागणार आहे.

वॉर्नरला आणखी एक झटका

एका वर्षाची बंदी असली तरी स्मिथचा दोन वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून विचार होऊ शकतो, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलं आहे. डेव्हिड वॉर्नरला मात्र यापुढे कधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता येणार नाही. बॉलशी छेडछाड करण्याचा प्रमुख सूत्रधार वॉर्नर असल्यामुळे त्याच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

डॅरेन लेहमनचाही राजीनामा

बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमननंही राजीनाम्याची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टनंतर लेहमन प्रशिक्षकपद सोडणार आहेत.

स्मिथ ओक्साबोक्शी रडला

स्टीव्ह स्मिथनं आज पत्रकार परिषद घेऊन बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले.

यावेळी स्मिथला मात्र आपले अश्रू आवरता आले नाही. मला हे दु:ख सलतय. मी मनापासून माफी मागतो. मी क्रिकेटवर प्रेम करतो. माझ्यामुळे ऑस्ट्रेलिया, क्रिकेटचे चाहते आणि इतरांना खूप त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो, चेंडू कुरतडणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक. घडल्याप्रकाराची सर्व जबाबदारी माझी आहे, असे पुढे स्मिथ म्हणाला. दरम्यान, या प्रकरणामुळे आपल्या घरच्यांना कशी मानहानी सहन करावी लागली. आई-वडिलांच्या डोळ्यात आपल्यामुळे अश्रू आल्याचे तो म्हणाला. 

 

Read More