Social Media on Indias Win: भारताने ओव्हलमधील सामना जिंकल्यानंतर सोशल मीडियावर पोस्टचा आणि प्रतिक्रियांचा महापूरच आला आहे. इंग्लंड 35 धावा सहज करेल असं वाटत असतानाच मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी त्यांच्यासमोर अडथळे उभे केले आणि तोंडचा घास हिरावून घेतला. दोघांनीही अखेरचे चार विकेट काढले आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सिराजने तीन आणि कृष्णाने एक विकेट घेतली. यानंतर सोशल मीडियावर दोघांचं कौतुक होत असून, हेच खऱ्या भारताचं चित्र असल्याचं म्हटलं जात आहे. 'मोहम्मद आणि कृष्णाने भारताला जिकवलं, हा आहे खरा भारत', अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 396 धावांवर ऑल आऊट झाला होता. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. यापैकी बेन डकेटने 54, जो रूटने 105, हॅरी ब्रुकने 111 धावा केल्या. इंग्लंड विजयापासून केवळ 35 धावा दूर होती, तेवढ्यात स्टेडियम परिसरात ढग दाटून आले आणि अपुऱ्या प्रकाशामुळे सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अंपायरनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.
Mohammad Siraj showing the wallpaper he saved - 'believe'. pic.twitter.com/qnpXfwtR85
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 4, 2025
ओव्हल टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 4 विकेट तर इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती. विजय अशक्य वाटतं असताना मोहम्मद सिराज आणि कृष्णा यांनी इंग्लंडला ऑल आउट केले. भारताने 6 धावांनी हा सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिका अनिर्णित राखली आहे.
सामन्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, 'काल 19 धावांवर हॅरी ब्रुकचा झेल सोडला आणि त्यानंतर त्याने शतक झळकावलं. यानंतर माझ्यावर दबाव होता. पण मला पूर्ण आत्मविश्वास होता. मी सकाळी उठलो आणि गुगलवर जाऊन बिलीव्ह इमोजी डाउनलोड केला आणि तो वॉलपेपरवर लावला. मला माहित होते की मी ते करू शकतो आणि गेम चेंजर बनू शकतो. मालिकेचा प्रत्येक सामना पाचव्या दिवसापर्यंत चालला आणि आम्हाला खूप मजा आली.'
ओव्हल कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली. पण झेल सोडल्यानंतर त्याच्यावर दबाव आला होता. त्याने चौथ्या दिवशी हॅरी ब्रूकला फक्त 19 धावांवर असताना जीवनदान दिलं होतं. त्यानंतर ब्रूकने याचा फायदा घेत 111 धावांची खेळी खेळली. त्यामुळे सिराजवर विजयाचा दबाव दुप्पट झाला. पाचव्या दिवशी मैदानात उतरण्यापूर्वी त्याने अशी खेळी केली की त्याने एकट्याने विजयाची कहाणी लिहिली. पाचव्या दिवशी त्याने 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
अँडरसन-तेंडुलकर मालिका सुरु झाल्यानंतर सर्वांचंच लक्ष भारतीय संघाकडे होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या नेतृत्वातील संघ मैदानावर उतरणार असल्याने सर्वांचीच परीक्षा होती. दुसरीकडे गौतम गंभीरलाही आपल्याला प्रशिक्षक म्हणून स्वत:ला सिद्ध करायचं होतं. पाच सामन्यानंतर भारतीय संघ या परीक्षेत यशस्वी झाला आहे असं म्हणू शकतो. पाच सामन्यांची मालिका 2-2 ने अनिर्णित राहिली आहे.
मोहम्मद सिराज या मालिकेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ओव्हल कसोटीत 9 विकेट घेतल्या आणि संपूर्ण मालिकेत 23 विकेट घेतल्या. पाचव्या दिवशी त्याने तीन मौल्यवान विकेट घेतल्या आणि इंग्लंडला 35 धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला.
FAQ :
FAQ
1. ओव्हल कसोटी सामन्यात भारताने काय पराक्रम केला?
भारताने ओव्हल येथील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत सोडवली.
2. या सामन्यात भारताच्या विजयाचे मुख्य नायक कोण होते?
मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी शेवटच्या दिवशी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचे चार विकेट घेतले, ज्यामुळे भारताला विजय मिळाला. सिराजने ३ आणि कृष्णाने १ विकेट घेतली.
3. सामन्याच्या शेवटच्या दिवशी काय घडलं?
शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे ४ विकेट शिल्लक होत्या. मात्र, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला ३६७ धावांवर सर्वबाद केले, आणि भारताने ६ धावांनी सामना जिंकला.
4. सिराजच्या प्रेरणेचं कारण काय होतं?
सिराजने सामन्यापूर्वी गुगलवरून 'बिलीव्ह' इमोजी डाउनलोड करून त्याचा फोन वॉलपेपर बनवला, ज्याने त्याला आत्मविश्वास दिला. हॅरी ब्रूकचा झेल सोडल्यानंतर निर्माण झालेल्या दबावानंतरही त्याने शानदार पुनरागमन केले.