सौरव गांगुलीने बीसीसीआय अध्यक्ष म्हणून आपल्या कारकिर्दीवर भाष्य करताना, जय शाह यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दलही सांगितलं आहे. तत्कालीन बोर्ड सचिव आणि सध्याचे आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याकडून आपल्याला विशिष्ट प्रकारच्या कणखरपणा आणि हट्टीपणाची अपेक्षा होती, पण त्यांचा प्रामाणिकपणा आणि गोष्टी योग्य प्रकारे करण्याच्या दृढनिश्चयाने प्रभावित झालो होतो असं गांगुलीने सांगितलं आहे.
सौरव गांगुली आणि जय शाह ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2022 पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीसीसीआयमध्ये सहकारी होते. याच काळात कोविडमुळे क्रीडा विश्व ठप्प झालं होतं. पण सौरव आणि जय शाह यांनी यातून मार्ग काढला होता.
"त्यांची (जय शाह) आपल्या पद्दतीने गोष्टी करण्याची पद्धत आहे. त्यांच्याबद्दल सर्वोत्तम बाब म्हणजे, त्यांना भारतीय क्रिकेटसाठी योग्य पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत," असं सौरव गांगुलीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
"त्यांच्याकडे सगळे हक्क होते, पाठिंबा होता, म्हणून तुम्हाला त्याच्याकडून विशिष्ट प्रकारची कणखरता, हट्टीपणा अपेक्षित होता. पण ते भारतीय क्रिकेटसाठी काही गोष्टी करत आहेत," असं कौतुक सौरव गांगुलीने केलं.
सौरव गांगुली जय आणि शाह दोघेही बीसीसीआयच्या पदांवर पहिल्यांदाच आले होते. त्याआधी गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता, तर शाह गुजरात क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी होते. 2022 मध्ये गांगुलीच्या जागी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती झाली, परंतु शाह नोव्हेंबर 2024 पर्यंत बीसीसीआयचे सचिव म्हणून पदावर राहिले. त्यानंतर आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान मिळवला.
राजकीय कुटुंबातील वारसदार असणारे जय शाह आणि एक प्रसिद्ध क्रिकेटर यांच्यातील नातं कसं होतं? याबद्दल विचारण्यात आलं असता गांगुलीने सांगितलं की, "नातं फार चांगलं होतं. अजूनही ते चांगलं आहे. जेव्हा सप्टेंबर 2019 मध्ये ते आले तेव्हा फार तरुण, सहकार्य करणारे आणि संवाद साधणारे होते".
"नक्कीच त्यांची काही मतं होती आणि ती असायला हवीत. त्यांना काही गोष्टी करायच्या होत्या आणि अजूनही करत आहेत. ते आता आयसीसी चेअरमन पदावर म्हणजे आणखी मोठ्या हुद्द्यावर आहेत. ते खेळाडूंना फार मदत करतात. नव्या गोष्टी शिकत ते अजून चांगले झाले आहेत. त्यांच्याबद्दल चांगली बाब म्हणजे त्यांना खेळासाठी चांगल्या गोष्टी करायच्या आहेत," असं कौतुक गांगुलीने केलं.
जय शाह यांना आपल्या स्टेटसची पूर्ण जाणीव होती आणि ते नेहमीच त्याचे काम तत्त्वनिष्ठ पद्धतीने पार पाडू इच्छित होते असंही तो म्हणाला. "ते खूप प्रामाणिक आहे, त्याच्या मनात नेहमीच ते कोण आहेत, त्यांच्याकडे आपल्यावर काय जबाबदारी आहे याची जाणीव होती, म्हणून, ते नेहमीच गोष्टी नीट आणि योग्यरित्या करू इच्छित होते", असं गांगुलीने सांगितलं.
"आपण सर्वांनी चुका केल्या आहेत, मी केल्या, त्यांनीही केल्या. हे कधीही जाणूनबुजून केले नव्हते पण खेळ कधीच थांबला नाही," असं गांगुली पुढे म्हणाला.