लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरने (David Miller) 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाबाबत सुरू असलेल्या वादावर आयसीसीवर टीका केली आहे. 363 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव झाला. यामुळे मिलरचं शतक वाया गेलं. यानंतर डेव्हिड मिलरने वेळापत्रकावरुन नाराजी जाहीर केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विचित्र वेळापत्रकामुळे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाला गट सामने पूर्ण केल्यानंतर भारताविरुद्धच्या संभाव्य उपांत्य सामन्याच्या तयारीसाठी पाकिस्तानहून दुबईला जावं लागलं. पण भारताने शेवटच्या ग्रुप सामन्यात न्यूझीलंडला हरवल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियात लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी पाकिस्तानला परतावं लागले. राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने ही गुंतागुंत झाली आहे. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जात आहेत.
"हा फक्त 1 तास 40 मिनिटांचा प्रवास आहे. पण आम्हाला तो करावा लागला हे आदर्शवत नव्हतं," असं मिलरने न्यूझीलंडकडून 50 धावांनी पराभव झाल्यानंतर म्हटलं. "सकाळ झाली, खेळ संपला आणि आम्हाला उड्डाण करावं लागलं. मग आम्ही दुपारी 4 वाजता दुबईला पोहोचलो. आणि सकाळी 7.30 वाजता आम्हाला परत यावे लागले. त्यामुळे ते फार सुखावह नव्हतं. आम्ही पाच तास उड्डाण केलं, आमच्याकडे सुस्थितीत येण्यासाठी पुरेसा वेळ होता, परंतु तरीही परिस्थिती आदर्श नव्हती," असं मिलरने म्हटलं.
न्यूझीलंडने धावांचा डोंगर उभा केल्यानंतर मिलरने 67 चेंडूत 100 धावा ठोकत संघाला विजयाच्या समीर नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे हे प्रयत्न कमी पडले आणि न्यूझीलंड संघ अंतिम फेरीत दाखल झाला. आता भारत आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना होणार आहे. दरम्यान यानिमित्ताने न्यूझीलंडने चॅम्पिअन्स ट्रॉफीत आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी या सामन्यात शतकं ठोकली.
भारतीय संघाने चॅम्पिअन्स ट्रॉफीत चमकदार कामगिरी केली असली तरी मिलरने न्यूझीलंड संघ जबरदस्त कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मी न्यूझीलंडला पाठिंबा देत असल्याचं त्याने सांगितलं आहे.