Cristiano Ronaldo Georgina Rodriguez Engagement : एखाद्या माणसावर असणारं प्रेम आणि याच प्रेमाच्या नात्यतून मिळणारा सहवास अनेकदा नात्यात इतके अनुभव देऊन जातो, की त्या नात्याला वेगळी ओळख देण्यापेक्षाही नात्यात असणाऱ्या व्यक्तींचं एकत्र असणंच सर्वस्वी महत्त्वाचं ठरून जातं. असंच नातं, जागतिक स्तरावरील लोकप्रिय फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि त्याची प्रेयसी, साथीदार जॉर्जिना रॉड्रिग्जचं.
जवळपास आठ वर्षांपासून हे दोघंही एकत्र असून, या नात्यात रोनाल्डोच्या कारकिर्दीतील आव्हानात्मक काळापासून ते अगदी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्त स्तरावर असेपर्यंतच्या काळात जॉर्जिनानं त्याला साथ दिली. मागच्या कैक वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून, अखेर या सेलिब्रिटी जोडीनं या नात्याला एक वेगळं नाव दिलं आहे. जॉर्जिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो आणि त्याला साजेसं कॅप्शन देत ही गोड बातमी शेअर केली.
Sí, quiero. En esta y en todas mis vidas असं कॅप्शन देत तिनं हातात चकाकणाऱ्या हिऱ्याची अंगठी असणारा एक फोटो शेअर केला. तिच्या इंग्रजी कॅप्शनचा अर्थ होतो, 'Yes, I do. In this and all my lives' म्हणजेच, 'मी होकार दिला... या आणि माझ्या सर्व जन्मांसाठी...'. जॉर्जिनानं अतिशय मनापासून लिहिलेलं हे कॅप्शन आणि तिची पोस्ट पाहता पाहता व्हायरल झाली, इतकी की सोशल मीडियावरही या सेलिब्रिटी जोडीच्या Engagement नं चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
रोनाल्डो आणि जॉर्जिनानं त्यांच्या नात्याची 2017 मध्ये त्यांच्या नात्यासंदर्भातील वृत्तांना दुजोरा दिला होता. स्वित्झर्लंडमधील झ्युरिक इथं झालेल्या फिफा फुटबॉल पुरस्कारांवेळी त्यांनी पहिल्यांदा एकत्र हजेरी लावली होती. जॉर्जिना एक स्पॅनिश मॉडेल आणि सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सर असून, रोनाल्डो मॅन्चेस्टर युनायटेड, रिअल मद्रिद, जुवेंट्ससाठी खेळल्यानंतर आता सौदी अरबमधील अल नासर क्लबसाठी खेळतो. याशिवाय पोर्तुगालच्या फुटबॉल संघासाठीसुद्धा तो महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी ओळखला जातो.
राहिला मुद्दा पहिल्या भेटीचा, तर 2016 मध्ये मद्रिदमधील गुच्ची स्टोअरमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. जिथं, जॉर्जिना सेल्स असिस्टंट म्हणून काम करत होती. जॉर्जिना आणि रोनाल्डोला एकूण पाच मुलं आहेत. त्यातील ख्रिस्तीयानो रोनाल्डो ज्युनियरचा जन्म 2010 मध्ये झाला होता. तर, जून 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून जॉर्जिना आणि रोनाल्डोनं जुळ्या मुलांचं पालकत्वं स्वीकारलं. ईवा आणि मातेओ अशी त्यांची नावं. 2017 मध्येच जॉर्जिना गर्भवती राहिली आणि त्यांनी आपल्या चौथ्या बाळाचं स्वागत केलं. तर, 2022 मध्ये जॉर्जिनानं जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र त्यातील मुलाचं निधन झालं आणि लेक बेलाला वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालं.
रोनाल्डो आणि जॉर्जिना किती वर्षांपासून एकत्र आहेत?
रोनाल्डो आणि जॉर्जिना 2016 पासून एकत्र आहेत, म्हणजेच जवळपास नऊ वर्षे. त्यांनी 2017 मध्ये झ्युरिक येथील फिफा फुटबॉल पुरस्कार सोहळ्यावेळी प्रथम एकत्र सार्वजनिक हजेरी लावली होती.
त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली?
2016 मध्ये मद्रिदमधील गुच्ची स्टोअरमध्ये रोनाल्डो आणि जॉर्जिनाची पहिली भेट झाली, जिथे जॉर्जिना सेल्स असिस्टंट म्हणून काम करत होती. त्यानंतर त्यांचे नाते विकसित झाले आणि 2017 मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिला.
रोनाल्डो आणि जॉर्जिनाला किती मुले आहेत?
रोनाल्डो आणि जॉर्जिनाला एकूण पाच मुले आहेत. यामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो ज्युनियर (2010 मध्ये जन्म), जुळे - ईवा आणि मातेओ (2017 मध्ये सरोगसीद्वारे), अलाना मार्टिना (2017), आणि बेला इस्मेराल्डा (2022) यांचा समावेश आहे. 2022 मध्ये जॉर्जिनाने जुळ्या मुलांना जन्म दिला, परंतु त्यातील मुलाचे निधन झाले.