Sunil Gavaskar Birthday : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर हे आज त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'लिटिल मास्टर' म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटला अशा उंचीवर नेले जिथून आज विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिलसारखे खेळाडू जागतिक पातळीवर चमकू शकले.
भारत जेव्हा परदेशी मैदानावर संघर्ष करत होता त्यावेळी सुनील गावस्कर यांनी जगातील सर्वोत्तम गोलंदाजीचा सामना करत शानदार कामगिरी केली. अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. सुनील गावस्कर हे टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार धावा आणि 34 शतके करणारे जगातील पहिले फलंदाज होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेले 3 मोठे विक्रम पाहूयात. जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.
एका संघासाठी सलग सर्वाधिक टेस्ट सामने खेळण्याचा विक्रम
सुनील गावस्कर हे अशा काही निवडक फलंदाजांपैकी एक आहेत ज्यांनी एका संघासाठी सर्वाधिक सलग टेस्ट सामने खेळले आहेत. त्यांनी भारतासाठी सलग 106 टेस्ट सामने खेळले आहेत. हा विक्रम अजूनही कायम आहे. भारताकडून अजून कुणीही इतके सलग सामने खेळलेले नाही. जगभरातही सुनील गावस्कर हे एका संघासाठी सलग सर्वाधिक टेस्ट सामने खेळणारे चौथ्या क्रमांकाचे फलंदाज आहेत.
पहिल्या टेस्ट मालिकेत सर्वाधिक धावा
सुनील गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध आपल्या पदार्पणाच्या मालिकेत 774 धावा केल्या होत्या. या मालिकेत त्यांनी 1 द्विशतक, 4 शतके आणि 3 अर्धशतके केली होती. हा विक्रम आजही टिकून आहे. कोणत्याही क्रिकेटपटूने आपल्या पहिल्याच मालिकेत सुनील गावस्कर यांच्या पेक्षा जास्त धावा करू शकला नाही.
हेल्मेट न घालता सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
सुनील गावस्कर हे अशा काळात फलंदाजी करत होते जेव्हा हेल्मेटचा वापर होत नव्हता आणि गतीवान गोलंदाज बाऊन्सरचा भडिमार करत असायचा. तरीही सुनील गावस्कर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 10 हजार पेक्षा जास्त धावा केल्या. इतकच नाही तर भारतीय कसोटी कर्णधार म्हणून देखील एका मालिकेत त्यांनी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी 1978-79 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 732 धावा केल्या होत्या.