Sunil Gavaskar Gives Special Gift to Shubman Gill: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक खास क्षण सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. भारताचे महान क्रिकेटपटू आणि सध्या समालोचन करत असलेले ‘लिटिल मास्टर’ सुनिल गावसकर यांनी टीम इंडियाच्या टेस्ट कर्णधार शुभमन गिलला एक खास भेट दिली.
गावसकर यांनी गिलला आधी एक शर्ट दिला आणि त्यानंतर स्वत:च्या स्वहस्ताक्षरांनी सही केलेली टोपीही दिली. हे देताना ते म्हणाले, "ही छोटीशी टोपी आहे, जी मी फार थोड्या लोकांना देतो. यावर माझी सही आहे," असं गावसकर यांनी म्हटलं. तसंच, त्यांनी शुभमनला सांगितलं की इंग्लंडविरुद्धचा हा सामना जिंकण्यासाठी ते ‘लकी जॅकेट’ घालणार आहेत जे त्यांनी २०२१ साली गब्बा टेस्ट दरम्यान घातलं होतं. त्या ऐतिहासिक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा गब्बा किल्ला भेदला होता.
दरम्यान, चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी फक्त ९ गडी बाद करायचे आहेत. इंग्लंडच्या संघाने ३७४ धावांचा पाठलाग करताना दिवसाखेर ५०/१ अशी मजल मारली आहे. भारताला मालिका बरोबरीत आणण्यासाठी विजय आवश्यक आहे.
शुभमन गिलला सुनिल गावसकर यांचा ऐतिहासिक विक्रम मोडण्याची संधी होती, मात्र पाचव्या टेस्टमध्ये तो अपयशी ठरला. गावसकर यांनी १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात ७७४ धावा करत विक्रम केला होता जो अजूनही अबाधित आहे. शुभमनने मात्र संपूर्ण मालिकेत १० डावांत ७५४ धावा केल्या. पाचव्या टेस्टमध्ये त्याने अनुक्रमे २१ आणि ११ अशी निराशाजनक कामगिरी केली. दुसऱ्या डावात तर जेवणाच्या विश्रांतीनंतर लगेच पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला.
तरीही, गिलने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला ‘टेस्ट मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार’ म्हणून. गावसकर यांनी १९७८-७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७३२ धावा केल्या होत्या. तब्बल ४६ वर्षांनंतर शुभमन गिलने तो विक्रम मागे टाकला.
A wholesome moment between Shubman Gill & Sunil Gavaskar #SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings | @ShubmanGill pic.twitter.com/2wYhLiMCAR
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 2, 2025
हा क्षण भारतीय क्रिकेटसाठी एक भावनिक आणि प्रेरणादायी ठरला . एका दिग्गजाने उगवत्या ताऱ्याला दिलेली मान्यता आणि पाठिंबा, क्रिकेट रसिकांच्या मनात घर करून गेला.