Sunil Gavaskar on Bowlers Workload: कसोटी क्रिकेटमधील वर्कलोड हे फक्त मिथक असून मोहम्मद सिराजने ते सिद्ध केलं आहे असं कौतुक भारताचे दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांनी केलं आहे. मोहम्मद सिराजने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पाचही सामने खेळत 23 विकेट घेतले आणि मालिका 2-2 ने अनिर्णित राखली. भारतीय कॅम्पमध्ये मागील अनेक काळापासून गोलंदाजांवरील वर्कलोडची चर्चा होत असून, त्यांना कशाप्रकारे आराम देत खेळवलं जाऊ शकतं याकडे कल असतो. प्रत्येक गोलंदाजाला एखाद, दुसऱ्या सामन्यात आराम मिळाला असताना मोहम्मद सिराज एकमेव गोलंदाज आहे ज्याने पाचही मालिका खेळल्या.
मोहम्मद सिराजने 9 डावांमध्ये 185.3 ओव्हर्स टाकल्या. दोन्ही बाजूंनी कोणत्याही गोलंदाजाने टाकलेल्या या सर्वाधिक ओव्हर्स आहेत. तसंच त्याने 23 विकेट्सही घेतले. यामध्ये दोन वेळा पाच विकेट्सचा समावेश होता, त्यापैकी एक ओव्हल येथे झालेल्या मालिकेच्या अंतिम सामन्यात होता. त्याने 9 विकेट्स घेतल्याने भारताने इंग्लंडचा 6 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
इंडिया टुडेशी संवाद साधताना, सुनील गावस्कर यांनी मोहम्मद सिराजचं कौतुक केलं. गावसकरांनी फक्त त्याच्या कामगिरीबद्दलच नाही तर खेळाप्रती असलेल्या त्याच्या समर्पणाबद्दल आणि कोणत्याही परिस्थितीत भारतासाठी मालिका जिंकण्यासाठी त्याच्या अथक प्रयत्नांबद्दल पाठीवर कौतुकाची थाप दिली. गावसकर म्हणाले की, या वेगवान गोलंदाजाने एकट्याने सिद्ध केले की वर्कलोड हा एक मिथक आहे आणि तो शारीरिकपेक्षा मानसिक जास्त आहे.
"गोलंदाज नेहमी सामना जिंकवून देतात असं म्हटलं जातं. पण तुम्ही धावा करणंही गरजेचं असतं. भारताने धावा केल्या नाहीत म्हणूनच दोन सामने गमावले. सिराजने अत्यंत मनापासून गोलंदाजी केली आणि वर्कलोड हे मिथक असल्याचं सिद्ध केलं. मला आशा आहे की, वर्कलोड ही संकल्पना आता भारताच्या डिक्शनरीतून बाहेर जाईल. मी हे फार काळापासून बोलत आहे. त्याने सलग पाच सामन्यात 6 ओव्हर, 8 ओव्हर टाकल्या कारण कर्णधाराची इच्छा आणि देशाची अपेक्षा होती. मला वाटतं आपण ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वर्कलोड हे शारिरीक नसून मानसिक आहे," असं गावसकरांनी म्हटलं आहे.
गावसकर यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाला अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अडकू नये असा इशारा दिला. त्यांनी मँचेस्टरमध्ये ऋषभ पंतच्या धाडसाचं उदाहरण दिले. पंतने पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली असतानागी फलंदाजी केली आणि महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले ज्यामुळे भारताला चौथ्या कसोटीत अनिर्णित राहता आले आणि ओव्हलमधील निर्णायक सामना खेळवण्यात आला याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
"जर तुम्ही कामाच्या ओझ्याबद्दल बोलणाऱ्या लोकांच्या आहारी जात असाल, तर तुमचे सर्वोत्तम खेळाडू कधीही मैदानावर असणार नाहीत. तुम्हाला त्यांना त्या स्थितीत न्यायचं आहे की सांगू शकाल, हॅलो तू देशासाठी खेळत आहेस आणि देशासाठी खेळताना तुला होणाऱ्या वेदना सहन कराव्या लागतील. बॉर्डरवर देखील हीच अपेक्षा असते. तुम्हाला काय वाटतं, जवान थंडी किंवा कोणत्या परिस्थितीत आहोत याची तक्रार करतात. ते तिथे देशासाठी असतात. देशाला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही अपघाती दुखण्याची चिंता करु नका. रिषभ पंतने तुम्हाला काय दाखवलं? फ्रॅक्चर असतानाही तो खेळला. संघाकडून याच अपेक्षा असतात. याचीच सर्वांना अपेक्षा असते. छोट्या दुखापतींनी लगेच बाहेर पडू नका. 140 कोटी लोकांमध्ये तुम्हाला मिळालेला तो सन्मान आहे. तुम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळत आहे यासाठी नशिबवान आहात. सिराजच्या बाबतीत हेच दिसलं आहे. पाच सामन्यात, त्याने सलग गोलंदाजी करत हे दाखवून दिलं आहे," असं गावसकर म्हणाले आहेत.
गावस्कर यांनी वर्कलोडबद्दल आपण करत असलेलो टीका बुमराहच्या दिशेने नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बुमराहला इंग्लंड दौऱ्यादरम्यान दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यांनी स्पष्ट केले की वेगवान गोलंदाजाची अनुपस्थिती सततच्या दुखापतीमुळे होती, कोणत्याही रोटेशन स्ट्रॅटेजीचा भाग नव्हती.
“तुम्ही घरच्या मैदानावर खेळता तेव्हा ही समस्या नसते, परंतु निश्चितच परदेशात होणाऱ्या मालिकेत, संघाचे संतुलन प्रभावित होऊ शकते. घरी, तुमच्याकडे राखीव खेळाडूंना बोलावण्यासाठी पुरेसा वेळ असतो, म्हणून तो फारसा मुद्दा नाही. पण परदेशात जाताना, तुम्हाला कदाचित त्या घटकाकडे लक्ष द्यावे लागेल. बुमराहला दुखापत झाली होती, त्याच्या वर्कलोडची समस्या नव्हती. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. आणि म्हणूनच मला वाटते की तेदेखील विचारात घेतले पाहिजे. जेव्हा तो दोन कसोटी सामने खेळला तेव्हा त्याने दोन वेला पाच विकेट्स घेतले. भारत जिंकला नसता, परंतु त्याने त्या विकेट घेतल्या. म्हणून तुम्ही तो किती अद्भुत गोलंदाज आहे हे विसरू नये,” असंही गावसकर म्हणाले.
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह एप्रिलच्या मध्यापर्यंत खेळू शकला नाही. निवडकर्त्यांनी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाशी सल्लामसलत करून नंतर निर्णय घेतला की बुमराह त्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडमध्ये फक्त तीन सामने खेळेल.
FAQ
1) सुनील गावसकर यांनी मोहम्मद सिराजबद्दल काय म्हटलं आहे?
सुनील गावसकर यांनी मोहम्मद सिराजचं कौतुक करताना म्हटलं की, त्याने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पाचही कसोटी सामने खेळून २३ विकेट्स घेतल्या आणि वर्कलोड हा मिथक असल्याचं सिद्ध केलं. सिराजच्या समर्पण आणि देशासाठी खेळण्याच्या उत्साहाचं त्यांनी विशेष कौतुक केलं.
2) मोहम्मद सिराजने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये काय कामगिरी केली?
मोहम्मद सिराजने पाच कसोटी सामन्यांमध्ये १८५.३ षटकं टाकली, जे मालिकेतील सर्वाधिक षटकं आहेत. त्याने २३ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये दोनदा पाच विकेट्सचा समावेश आहे. विशेषतः ओव्हल येथील अंतिम सामन्यात त्याने ९ विकेट्स घेत भारताला ६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
3) गोलंदाजांच्या वर्कलोडबाबत गावसकरांचं मत काय आहे?
गावसकर यांचं म्हणणं आहे की, गोलंदाजांचं वर्कलोड हे शारीरिकपेक्षा मानसिक आहे. त्यांनी सिराजच्या उदाहरणाद्वारे सांगितलं की, खेळाडूंनी देशासाठी खेळताना दुखापतींची तक्रार न करता खेळावं. त्यांनी वर्कलोडची संकल्पना भारतीय क्रिकेटमधून काढून टाकण्याची मागणी केली.