काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लठ्ठ म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सुनावलं आहे. शमा मोहम्मद यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत रोहित शर्मा खेळाडू म्हणून फार जाड असून, त्याने वजन कमी करण्याची गरज आहे असं लिहिलं होतं. "रोहित शर्मा हा फार लठ्ठ खेळाडू आहे. त्याने वजन कमी करण्याची गरज आहे. तो आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे," अशी पोस्ट शमा मोहम्मद यांनी शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टवरुन गदारोळ निर्माण झाला असून, सर्व स्तरातून टीका होत आहे.
दरम्यान सुनील गावसकर यांनी क्रिकेट हे मानसिक बळावर आधारित असून, खेळाडूच्या शारीरिक स्वरूपाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं मत मांडलं आहे. जर निवडीचा पहिला निकष फिटनेस असेल तर मॉडेल्सना संघात निवडलं पाहिजं, असंही त्यांनी सुनावलं आहे. "मी नेहमीच म्हटलं आहे की, जर तुम्हाला फक्त सडपातळ मुलं हवी असतील, तर तुम्ही मॉडेलिंग स्पर्धांमध्ये गेलं पाहिजे आणि तेथून मॉडेल्सची निवड करायला हवी. हे त्याबद्दल नाही," असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.
"तुम्ही क्रिकेट किती चांगले खेळू शकता याबद्दल सर्व आहे. आम्ही सरफराज खानबद्दल बोलत होतो. त्याचं वजन जास्त असल्याने बराच काळ त्याला बदनाम केलं गेलं. पण जर त्याने कसोटी सामन्यात भारतासाठी 150 धावा केल्या आणि त्यानंतर आणखी दोन किंवा तीन अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या तर काय हरकत आहे? मला वाटत नाही की आकाराचा त्याच्याशी काही संबंध आहे. तुमची मानसिक ताकद महत्त्वाची आहे. तुम्ही अंतर टिकवू शकता की नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चांगली फलंदाजी करा, जास्त वेळ फलंदाजी करा आणि धावा करा," असं ते पुढे म्हणाले.
शमा मोहम्मद यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये रोहित शर्माची तुलना इतर भारतीय कर्णधारांशी केली आहे. रोहित शर्मा एक सामान्य कर्णधार असल्याचं त्यांनी म्हटलं. "त्याच्या आधीच्या कर्णधारांच्या तुलनेत त्याच्यात इतकं जागतिक दर्जाचं काय आहे? तो एक सामान्य कर्णधार आहे. तसंच एक सामान्य खेळाडू आहे जो नशीबवान असल्याने भारताचा कर्णधार झाला," असं त्यांनी सांगितलं होतं.
मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. सेमी फायनल असल्याने दोन्ही संघांसाठी अंतिम फेरी गाठण्यासाठी करो या मरो स्थिती आहे. यादरम्यान शमा यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडूनही (भाजप) टीका होत आहे. शमा यांचा स्वतःचा पक्ष काँग्रेसनेही त्यांच्यापासून फारकत घेतली आहे.
"काँग्रेस क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या योगदानाला सर्वोच्च मान देते आणि त्यांच्या वारशाला कमकुवत करणाऱ्या कोणत्याही विधानांचे समर्थन करत नाही," असे काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभाग प्रमुख पवन खेरा म्हणाले आहेत.