Sunil Gavaskar On Champions Trophy Semifinal: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केल्याने उपात्यंफेरीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमने-सामने असणार रविवारी स्पष्ट झालं. न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारताने 44 धावांनी जिंकत अ गटामध्ये अव्वल स्थान पटकावलं. आता भारताचा पुढील सामना 4 मार्च रोजी होणार आहे.
दुबई अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सेमी-फायनलचा सामना होणार आहे. तर दुसरी सेमी फायनल पाकिस्तानमधील गद्दाफी स्टेडियमवर 5 मार्च रोजी होणार आहे. मात्र भारताने रविवाराचा सामना मुद्दाम पराभूत होत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायला हवं होतं असं अनेक भारतीय चाहत्यांचं म्हणणं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाने 2023 चा एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना गमावल्यापासून भारतीयांनी धसका घेतल्याचं या लॉजिकवरुन स्पष्ट होतं. मात्र भारत ग्रुप स्टेजमधील अंतिम सामना खेळण्याआधीच माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी-फायनल खेळणं अधिक सोयीस्कर कसं ठरेल याबद्दल भाष्य केलं आहे.
साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड आणि भारत दोघेही सेमी-फायनलसाठी पात्र ठरलेलं. त्यामुळे ग्रुपमध्ये पहिल्या स्थानी कोण असणार हेच या सामन्यामधून ठरणार होतं. याचं उत्तर रविवारी मिळालं. मात्र हा सामना जिंकून ब गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यापेक्षा भारताने पराभूत होत अ गटात दुसऱ्या स्थानी राहून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमी-फायनल खेळली पाहिजे असं भारतातील अनेक चाहत्याचं म्हणणं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ऐनवेळी कच खाण्याच्या भारताचा इतिहास आणि दक्षिण आफ्रिकेला मोठ्या स्पर्धांमध्ये सेमी-फायनलला मिळणाऱ्या अपयशाची आकडेवारी पाहता दक्षिण आफ्रिका हा भारतासाठी सोयीस्कर प्रतिस्पर्धी ठरला असता असं तर्क मांडण्यात आलं. मात्र गावसकरांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी-फायनल खेळल्यास भारताला अधिक प्रोत्साहन मिळेल असं म्हटलं आहे.
'इंडिया टुडे'शी बोलताना गावसकरांनी, "दोन्ही उत्तम संघ आहेत. दोन्ही संघ फार कमी चुका करतात. अमुक एकच संघ हवा असं भारतीय संघ म्हणणार नाही. कारण आता सगळेच संघ बादफेरीत आले आहेत. आता करो या मरो अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच अमुक एक संघ आपल्याविरुद्ध हवा किंवा नको असा त्यांचा (भारतीय संघाचा) विचार असेल असं मला वाटत नाही," अशी प्रतिक्रिया नोंदवली. "असं काही असेलच तर भारतीय संघाला (सेमी-फायनलमध्ये) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणं अधिक सोयीस्कर ठरेल. कारण ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आहेत. त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या संघापेक्षा ऑस्ट्रेलियन संघ अधिक चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत 2024 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा सामना खेळला आहे," असंही गावसकर म्हणाले.
गावसकरांनी सध्याचा ऑस्ट्रेलियन संघ हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत सामना केलेल्या संघासारखा नसल्याचं म्हटलं आहे. खास करुन ऑस्ट्रेलियाचे तिन्ही प्रमुख वेगवान गोलंदाज नसणे संघावर परिणाम करणार असल्याचं गावसकरांनी नमूद केलं आहे. "त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा चांगला प्रतिस्पर्धी ठरु शकतो कारण त्यांचे प्रमुख गोलंदाज संघात नाहीत. स्टार्क, कमिन्स, हेजलवूड नसल्याने भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला आवडेल," असं गावसकरांनी म्हटलं आहे.