Suryakumar Yadav Photo With Father: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वातील प्ले ऑफचे सामने आज म्हणजेच 29 मेपासून सुरु होत आहे. पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सदरम्यान 30 मे रोजी खेळवला जाणार आहे. लीग स्टेजमधील आपल्या शेवटच्या सामन्यात पंजाबच्या संघाने 6 वकेट्स राहून पराभूत केलं. या सामन्यामध्येही यंदाच्या संपूर्ण पर्वाप्रमाणे सूर्यकुमार यादवने उत्तम खेळ केला.
आता मुंबईचा पुढचा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र लीग स्टेजमधील सामना आणि प्लेऑफच्या सामन्यादरम्यानच्या दिवसांमध्ये सूर्या अचानक मुंबईमधील आपल्या वडिलांच्या कार्यालयात येऊन गेला. यामागील कारणही तसं खास होतं. सूर्यानेच याबद्दलची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.
सूर्याने त्याच्या वडिलांच्या कार्यालयातील तीन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने तो नेमका वडिलांच्या ऑफिसमध्ये का गेला होता हे सांगितलं आहे. "माझ्या पहिल्या आणि कायमस्वरुपी नायकाला, आदर्श असलेल्या, जीवनात मार्गदर्शक करणाऱ्या मार्गदर्शकाला.. तुमची एक महत्त्वाची इनिंग संपत आहे आणि तुम्ही नेहमीच ही इनिंगही उत्तम खेळून काढली आहे अगदी तुम्ही घेतलेल्या प्रत्येक भूमिकेसारखीच..." असं सूर्याने वडिलांसोबत त्यांच्याच कार्यालयात क्लिक केलेले फोटो पोस्ट करताना म्हटलंय. "एक साधा माणूस ज्याने आम्हाला एक असाधारण जीवन देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. आज आम्ही तुम्हाला सांगतो, तुमच्या आणि तुमच्या कामगिरीचा आम्हाला किती अभिमान आहे. बाबा, पुढील इनिंगसाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे. फक्त ही इनिंग थोडी आरामदायी असेल," असं सूर्याने आपल्या वडिलांबद्दल लिहिताना म्हटलं आहे.
सूर्याचे वडील म्हणजेच अशोक कुमार यादव सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या छोटेखानी सोहळ्याला त्यांचा लाडका लेक आयपीएलच्या व्यस्त शेड्यूमधून वेळ काढून सपत्नीक उपस्थित राहिला होता. सूर्याचे वडील भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच BARC मध्ये इलेक्ट्रिकल इंजीनियर पदावर कार्यरत होते.
यंदाच्या पर्वात सूर्याने खेळलेल्या प्रत्येक सामन्यामध्ये 25 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने या कामगिरीसहीत सर्वाधिक वेळा म्हणजेच सलग 14 सामन्यांमध्ये 25 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.