भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंडमध्ये आहे आणि आपल्या पत्नी देविशा शेट्टीसोबत प्रतिष्ठित विम्बलडन टेनिस स्पर्धेचा आनंद घेत आहे. या वेळी त्याने क्रिकेटबाहेरच्या आपल्या आवडींचा खुलासा करत सांगितलं की तो क्रिकेटर नसता तर तो नक्की काय झाला असता. सूर्यकुमार यादव याबद्दल म्हणाला की, “मी नेहमी टिव्हीवर टेनिस बघत आलो आहे. सेंटर कोर्टच्या वातावरणाबद्दल खूप ऐकलं होतं, पण आज ते प्रत्यक्ष अनुभवतोय. हे खूपच खास आहे. मी क्रिकेटर नसता तर नक्कीच टेनिस खेळाडू झालो असतो!”
जेव्हा त्याला विचारण्यात आलं की, क्रिकेटर्समधून कोणाला डबल्स पार्टनर म्हणून निवडशील? त्यावर तो म्हणाला, “मी एमएस धोनीला निवडेन. तो वेगवान आहे, त्याचं स्टॅमिना जबरदस्त आहे, आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. त्याला मी अनेकदा टेनिस खेळताना पाहिलंय. त्यामुळे तोच माझा आदर्श पार्टनर असेल.”
आपल्या पहिल्यावहिल्या विम्बलडन दौऱ्याविषयी सांगताना सूर्यकुमार म्हणाला, “मी इथे पहिल्यांदाच आलोय आणि सगळं परिपूर्ण असावं, हीच इच्छा होती. देविशाने खूप मदत केली. काय घालायचं, कसं तयार व्हायचं याबाबत ती गेल्या काही दिवसांपासून मला मार्गदर्शन करत होती. इथल्या गर्दीत मीही एक चाहता आहे, जो फक्त या उत्सवाचा भाग व्हायचा आहे.”
आवडत असलेल्या टेनिसपटूंविषयी विचारल्यावर सूर्यकुमार म्हणाला, “मी इथे खास नोवाक जोकोविचला पाहण्यासाठी आलोय. त्याचं करिअर मी खूप काळापासून फॉलो करत आलोय. त्याची 'Serve to Win' ही पुस्तकसुद्धा मी वाचली आहे. जी मला खूप प्रेरणा देते. मी उशिरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलो, पण त्याची संघर्षाची गोष्ट मला स्वतःची आठवण करून देते. तो जसा सातत्याने पुढे जातो, ते अप्रतिम आहे.” विंबलडनमध्ये आवडते खेळाडू म्हणून त्याने पीट सॅम्प्रास आणि रॉजर फेडररचं नाव घेतलं. पण ऑल-टाइम फेव्हरेट विचारलं असता तो पुन्हा जोकोविचचं नाव घेतो. तर सध्याच्या पिढीत त्याला कार्लोस अल्काराजचं खेळणं खूप भावतं “जणू कोर्टवर वादळासारखा खेळतो,” असं तो म्हणाला.
क्रिकेट आणि टेनिसमधील साम्याबाबत सांगताना सूर्यकुमार म्हणाला, “या दोन्ही खेळांमध्ये मानसिक ताकद आणि स्टॅमिना खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये सतत 20-25 मीटरच्या रनिंगची गरज असते, तर टेनिसमध्येही अगदी तसंच असतं. त्यामुळे मानसिक तयारी आणि सहनशक्ती या दोन्ही खेळांत फारच महत्त्वाच्या आहेत.”