IND vs ENG: सध्या भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात कसोटी सामना रंगला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या नंबर-3च्या जागेसाठी सुरू असलेलं प्रयोग थांबवण्याची वेळ आली आहे. साई सुदर्शन आणि करूण नायरला मिळालेल्या संधी फसल्यामुळे आता एक नवा पर्याय समोर आलाय, जो सध्या भारतीय संघासाठी या क्रमांकाचा योग्य दावेदार मानला जातोय. शुभमन गिल जेव्हापासून नंबर-4 वर खेळायला लागला आहे, तेव्हापासून टीम इंडियाचं नंबर-3 साठीचं गणित अजूनही फिट बसलेलं नाही. साई सुदर्शन आणि करूण नायर या दोघांना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली, पण त्यांनी अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत.
साई सुदर्शनला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळाली, पण त्याचा फटका संघाला बसला. तो दोन्ही डावात फेल गेला. तो 0 आणि 30 धावा करून तो बाद झाला. करूण नायरलाही संधी मिळाली पण त्याचा फॉर्म देखील निराशाजनकच राहिला. सहा इनिंगमध्ये त्याने केवळ 0, 20, 31, 26, 40 आणि 14 धावा केल्या. त्यामुळे भारताच्या फलंदाजीच्या क्रमात सतत बदल करावे लागत आहेत. या प्रदर्शनानंतर करूण नायरचं टेस्ट करिअर संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ध्रुव जुरेलला सध्या भारताचा पुढचा नंबर-3 ठरवण्याची चर्चा जोरात आहे. कारण त्याच्याकडे तंत्रही आहे आणि मोठी खेळी करण्याची क्षमता देखील. तो केवळ चांगला फलंदाजच नाही, तर विकेटकीपरही आहे. त्याने याआधीच अशा परिस्थितीत भारतासाठी सामन्याचं चित्र बदललं आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये रांची टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने 90 धावांची खेळी करत भारताला संकटातून बाहेर काढलं होतं. भारताची अवस्था 161/5 अशी होती, पण जुरेलने 149 चेंडूंमध्ये 90 धावा करत सामना भारताच्या बाजूने वळवला. त्याच्या या खेळीमध्ये 6 चौकार आणि 4 षटकार होते. त्या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि जुरेलला 'प्लेयर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं. त्याची खेळी पाहून अनेकांना धोनीची आठवण आली होती.
हे ही वाचा: जर 'असं' झालं असतं तर भारत लॉर्ड्सवर हरला नसता! योगराज सिंह संतापले, म्हणाले "कोणताही खेळाडू..."
ध्रुव जुरेलकडं दबावात खेळण्याची खासियत आहे. त्याने 4 टेस्टमध्ये 202 धावा केल्या आहेत आणि त्याचा सरासरी 40.40 आहे. त्याने अजून शतक झळकावलेलं नसलं तरी 90 धावांची खेळी त्याच्या क्षमतेची ओळख करून देते.
हे ही वाचा: रवी शास्त्री आणि अक्षय कुमार सोबत लॉर्ड्सवर सामना बघायला आलेली 'ती' आहे तरी कोण?
भारताला अशाच खेळाडूची गरज आहे जो तंत्र आणि संयम राखून परिस्थिती नुसार मोठी खेळी करू शकेल. त्यामुळे ध्रुव जुरेलला नंबर-3 साठी संघात कायमस्वरूपी संधी द्यावी, अशी आता मागणी होत आहे.