Fan Dance Video Viral: भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या टेस्ट सामन्यात शेवटच्या दिवशी रंगतदार क्षण पाहायला मिळाले. रवींद्र जडेजा, शुभमन गिल, वॉशिंगटन सुंदर आणि केएल राहुल यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने सामना वाचवला. मात्र मैदानावर खेळाडू जितके चमकले, तितकाच एक चाहतादेखील चर्चेचा विषय ठरला. त्याने नक्की काय केलं हे जाणून घेऊयात..
ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका भारतीय फॅनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. आपल्या भन्नाट डान्सने सगळ्यांना त्याच्याकडे बघयाला भाग पाडलं. टीम इंडियाची जर्सी आणि डोक्यावर गुलाबी टोपी घातलेला हा फॅन, सामना वाचवण्यासाठी झुंजणाऱ्या भारतीय संघाला अजून जोश देत होता. त्याच्याकडून शक्य त्या पद्धतीने चिअर करत होता.
ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील 127 वा षटक झाल्यानंतरची आहे. वॉशिंगटन सुंदर आणि रवींद्र जडेजा मैदानावर जम बसवून खेळत होते, आणि सामना संपायला फक्त 26 षटके उरली होती. त्या निर्णायक क्षणी या उत्साही फॅनचा जल्लोष पाहून स्टेडियममध्ये रंगतच वेगळीच आली.
127 वा ओवर पूर्ण झाल्यानंतर ओवर ब्रेकमध्ये कॅमेऱ्यांनी एक खास क्षण टिपला. एक भारतीय चाहता प्रेक्षकगॅलरीत जबरदस्त जोशात डान्स करताना दिसला. टीम इंडियाने सामना ड्रॉच्या दिशेने नेताना दाखवलेल्या जिद्दीमुळे या चाहत्याचा उत्साह खूप होता. हे सेलिब्रेशन पाहून कॉमेंट्री करत असलेले माजी प्रशिक्षक आणि क्रिकेट विश्लेषक रवि शास्त्री स्वतःही थक्क झाले. त्यांनी लाईव्ह कमेंट्रीदरम्यान प्रतिक्रिया देताना म्हटलं, “वा! काय सेलिब्रेशन आहे!”
RAVI SHASTRI GOLD. pic.twitter.com/gZPL4O5KQ5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 27, 2025
भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात 4 बाद 425 धावा करत सामना ड्रॉमध्ये नेला. जडेजा 107 आणि सुंदर 101 धावांवर नाबाद राहिले, तर शुभमन गिलने 103 आणि केएल राहुलने 90 धावा केल्या. मैदानावरची ही चमकदार कामगिरी आणि प्रेक्षक गॅलरीतून आलेली साथ, या सामन्याला खास बनवून गेली.