Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारण

Gautam Gambhir Vs BCCI: गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच गंभीर आणि बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.

BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारण

Gautam Gambhir Vs BCCI: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करत असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी केली. मात्र नियुक्तीनंतर अवघ्या काही दिवसांमध्येच बीसीसीआयने गौतम गंभीरला एकामागोमाग एक दोन धक्के दिले आहेत. नियुक्तीच्या काही तासांमध्येच गंभीर आणि बीसीसीआयमध्ये एका प्रमुख मुद्यावरुन वाजल्याची माहिती समोर येत आहे. 

गंभीरची निवड तर झाली पण...

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी असलेला राहुल द्रविड भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 चं जेतेपद जिंकलेल्या दिवशी म्हणजेच 29 जून रोजी पदावरुन पायउतार झाला. त्याचप्रमाणे विराट कोहली, रोहित शर्मा आणि नंतर रविंद्र जडेजा यांनीही टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. द्रविडनंतर आता गौतम गंभीरकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गंभीरबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाच वर्षाचा करार केला आहे. प्रशिक्षक बदलल्यानंतर त्याला त्याच्या आवडीप्रमाणे सपोर्टींग स्टाफ दिला जातो. गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस महांब्रे, फिल्डींगचे प्रशिक्षक टी दिलीप आणि फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याजागी आता नवे सहाय्यक प्रशिक्षक निवडले जाणार आहेत. 

गंभीरच्या प्रधान्य क्रमावर कोण?

गंभीरची नियुक्ती निश्चित झाली असली तरी त्याला मदत करणारे हे सहाय्यक कोण असतील हे निश्चित झालेलं नाही. सध्या या पदांसाठी वेगवेगळी नावं चर्चेत आहेत. अगदी जॉण्टी ऱ्होड्सला फिल्डींग कोच बनवण्याचीही चर्चा आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाबरोबर गंभीर काम करत होता तेव्हा त्याने जॉण्टीबरोबर काम केलं होतं. तसेच गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाजीचा प्रशिक्षक अभिषेक नायरला आपला सहाय्यक बनवण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. त्याप्रमाणे गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून गंभीरचं प्राधान्य भारताचा माजी गोलंदाज आणि केकेआरचा गोलंदाजी प्रशिक्षक विनय कुमारला आहे.

नक्की वाचा >> खरा जेंटलमॅन! द्रविडने नाकारले शाहांनी दिलेले 2.5 कोटी; कारण वाचून म्हणाल, 'कमाल आहे हा माणूस'

गंभीर आणि बीसीसीआयमध्ये वाजलं?

मात्र आता यावरुनच गंभीर आणि बीसीसीआयचं वाजल्याची चर्चा आहे. बुधवारी एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या बोर्डाकडून गंभीरला हवी असलेली ही माणसं सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यास विरोध आहे. खास करुन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून बीसीसीआय गंभीरच्या एका माजी संघसहाकाऱ्यासाठी आग्रही आहे. भारताला 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या महाराष्ट्रातील मराठमोळा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानला गोलंदाजीचा प्रशिक्षक करण्यासाठी बीसीसीआय उत्सुक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या जहीरवर बीसीसीआयची नजर असून त्याच्याच नियुक्तीची शक्यात अधिक आहे. 

"गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून जहीर खान आणि लक्ष्मीपती बाजाली या दोघांच्या नावाची चर्चा बीसीसीआयकडून सुरु आहे. बीसीसीआयने या पदावर विनय कुमारला नियुक्त करण्यास नकार दिला आहे," असं बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. 

नक्की वाचा >> 'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली

कशी आहे या दोघांची कामगिरी?

जहीर खानने भारतासाठी 610 अंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. तो 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. जहीर 2014 साली निवृत्ती जाहीर केली. जहीर हा मुंबई इंडियन्सच्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम करायचा. त्यानंतर तो आता समालोचन आणि एका वेबसाईटसाठी तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर बाजालीने भारतीय संघासाठी 71 विकेट्स गेतल्या आहेत. त्याला गोलंदाजमधून करिअर गाजवता आलं नसलं तरी 2016 मधील निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून 2017 साली कोलकाता नाईट रायडर्स आणि नंतर पुढील पाच पर्वांमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाची येथे वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र दुसरीकडे गंभीरची फर्स्ट चॉइस असलेल्या विनय कुमारला बीसीसीआयचा मोठा विरोध आहे. 

नक्की वाचा >> BCCI ची 'गंभीर' भूमिका! विराटला साधं विचारलंही नाही; हार्दिकचा आवर्जून घेतला सल्ला

दुसरा धक्का कोणता?

गंभीरला दुसरा धक्का देताना बीसीसीआयने जॉण्टीच्या नियुक्तीलाही विरोध केल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलं आहे. जॉण्टीने अंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच आयपीएलमध्ये अनेक संघांसाठी फिल्डींग कोच म्हणून उत्तम कामगिरी केली असली तरी बीसीसीआय परदेशी प्रशिक्षक नेमण्यासाठी उत्सुक नाही अशी माहिती समोर आली आहे. मागील सात वर्षांपासून भारतीय प्रशिक्षकांनाच बीसीसीआयचं प्राधान्य राहिलं असून हीच भूमिका यापुढेही कायम असेल असं समजतं. द्रविडला साथ देणारे फिल्डींगचे प्रशिक्षक टी दिलीप यांनाच कायम ठेवण्यासाठी बीसीसीआय उत्सुक आहे. 

Read More