WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिकेने शनिवार 14 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 5 विकेटने पराभूत करून विजय मिळवला. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात मागील 27 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. 1998 नंतर दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, मात्र अखेर आज त्यांना हे यश मिळालं आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यावर कर्णधार टेम्बा बावुमाने ट्रॉफी खांद्यावर घेत हनुमानासारखी पोज देऊन खास सेलिब्रेशन केलं.
ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विजय मिळवल्यावर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भावुक झाले होते. त्यांनी केवळ ही चॅम्पियनशिपचं मिळवली नाही तर त्यांच्यावर वर्षानुवर्षांपासून लागलेला चोकर्स हा टॅग सुद्धा पुसला. विजयानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी सुपूर्द केली. दक्षिण आफ्रिकेने जल्लोषात सेलिब्रेशन केलं. यावेळी टेम्बा बावुमाने हनुमानाच्या गदेप्रमाणे ट्रॉफी खांद्यांवर घेऊन खास सेलिब्रेशन केलं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचं आव्हान असताना कर्णधार टेम्बा बावुमाने दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक ठोकलं. टेम्बाने 66 धावा केल्या यादरम्यान 5 चौकार ठोकले. टेम्बा बावुमाने केलेली ही संयमी खेळी दक्षिण आफ्रिकेसाठी महत्वाची ठरली.
पाहा व्हिडीओ :
THE CELEBRATION FROM TEMBA BAVUMA WITH THE WTC MACE. pic.twitter.com/ovzuumJv4P
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) June 14, 2025
ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार म्हटले जात होते, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्याला गुडघ्यावर आणलं. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार बवूमा याने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. पहिल्या डावात त्यांनी ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 138 धावांवर ऑल आउट केले. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला 207 धावांवर रोखलं ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 282 धावांचं आव्हान मिळालं.
विजयासाठी मिळालेलं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेच्या एडन मारक्रमने शतक ठोकलं. तर कर्णधार बवूमाने देखी नाबाद अर्धशतकीय कामगिरी केली. दोघांनी नाबाद राहून तिसऱ्या दिवशीचा खेळ 213 धावांवर संपवला, आता चौथ्या दिवशी विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला केवळ 69 धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी संयमी फलंदाजी करून ५ विकेटने विजयाचं आव्हान पूर्ण केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.