Radhika Yadav Murder : गुरुवारी राष्ट्रीय स्तरावरील स्टार टेनिसपटू राधिका यादवच्या (Radhika Yadav) हत्येच्या बातमीने क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली. 25 वर्षीय राधिकावर राहत्या घरात तिच्याच वडिलांनी ३ गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं परंतू तेथे तिला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून या घटनेबाबत पुढील चौकशी सुरु आहे. यादरम्यान राधिकाच्या वडिलांनी आपल्याच मुलीवर गोळ्या का झाडल्या यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
सदर घटना ही बुधवार 10 जुलै रोजी दुपारी 12 दरम्यान घडली. राधिका आपल्या कुटुंबासह गुरुग्रामच्या सेक्टर 57 मधील घरी राहत होती. रोपी वडिलांनी आपल्या मुलीवर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. गुरुग्राम पोलिसांनी हत्या करणाऱ्या वडिलांना अटक केली असून त्यांच्याकडून बंदूक सुद्धा ताब्यात घेण्यात आली ज्याने राधिकावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. राधिकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणात एक मोठा खुलासा केला असून ज्यामधून राधिकाच्या हत्या नेमकी का करण्यात आली हे सांगितलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, 'राधिका यादव ही एक राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू होती. तिने या खेळात अनेक मेडल सुद्धा जिंकले. काही महिन्यांपूर्वी तिच्या खांद्याला दुखापत झाली, ज्यामुळे तिने खेळणं बंद केलं होतं. खेळ सोडल्यावर राधिकाने वजीराबाद गावात लहान मुलांना टेनिस खेळ शिकवण्यासाठी एक अकॅडमी सुरु केली. पण राधिकाचे वडील याच्या विरोधात होते.
हेही वाचा : जसप्रीत बुमराहवर अचानक झाला 'अटॅक', लॉर्ड्सवर थांबवावी लागली चालू टेस्ट मॅच, Video
राधिकाने तिच्या वडिलांना याबाबत बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या वडिलांचं म्हणणं होतं की ते जेव्हा कधी घराबाहेर पडतात तेव्हा गावकरी त्यांना 'मुलीची कमाई खातोय' असे टोमणे मारतात. ज्यामुळे राधिकाचे वडील खूप त्रासले होते. ज्यामुळे मागील 15 दिवसांपासून दररोज घरी बाप लेकीची भांडण होत होती. गुरुवारी दुपारी राधिका जेव्हा स्वयंपाक घरात जेवण बनवत होती तेव्हा तिच्या वडिलांनी रागाच्या भरात मुलीच्या पाठीत तीन गोळ्या झाडल्या.
राधिकाचा भाऊ आणि काका कुलदीप हे दोघे तेव्हा घरात होते. या दोघांनी गंभीर स्थितीत राधिकाला मेरिंगो एशिया रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार दरम्यान राधिकाच्या मृत्यू झाला. रुग्णालयाने पोलिसांना हत्येची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घरी पोहोचून राधिकाच्या वडिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून बंदूक सुद्धा जप्त केली.
राधिका यादव ही आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) मध्ये युगल टेनिसपटू म्हणून 113 रँकिंगवर होती. असं सांगितलं जातं की राधिका यादवचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता.