Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताच्या कसोटी यशाचा सर्वात मोठा फटका रोहित आणि विराटला बसणार? 'ते' स्वप्न अपूर्णच राहणार?

Virat Kohli Rohit Sharma Chances Of Playing 2027 World Cup: भारतीय संघाच्या कसोटीमधील यशाचा फटका विराट आणि रोहित शर्माला बसणार असल्याची दाट शक्यता आहे.

भारताच्या कसोटी यशाचा सर्वात मोठा फटका रोहित आणि विराटला बसणार? 'ते' स्वप्न अपूर्णच राहणार?

Virat Kohli Rohit Sharma Chances Of Playing 2027 World Cup: भारतीय संघाने इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या अँडरसन-तेंडुलकर चषक स्पर्धेमधील शेवटची कसोटी अत्यंत रोमहर्षक लढतीनंतर जिंकत मालिका 2-2 च्या बरोबरीत सोडवली. या विजयाबरोबरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय योग्य असल्यावर शिक्कामोर्तब झालं. मात्र भारताने कसोटी क्रिकेटमध्ये यंग ब्रिगेडच्या मदतीने मिळवलेल्या या विजयामुळे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी मर्यादित क्रिकेट संघाची दारं बंद झाली आहेत की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

कसोटी मालिकेचा मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटवरही परिणाम?

भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील यशानंतर आता विराट कोहली आणि रोहित शर्माचं काय होणार याबद्दल उलट-सुलट चर्चा होताना दिसतेय. कसोटी क्रिकेटमध्ये भारतातील तरुण खेळाडूंनी इंग्लंडला 2-2 च्या बरोबरीत रोखले. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर या साऱ्या तरुण खेळाडूंनी उत्तम योगदान दिले आहे. भारताच्या तरुण खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळवले असले तरी संघाची निवड करताना मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विचार करताना या खेळाडूंकडे कानाडोळा करता येणार नाही. निवड समितीसमोरील आव्हान या मालिकेनंतर अधिक वाढलं आहे. त्यामुळेच आता बीसीसीआयला भविष्यातील योजनांबद्दल रोहित आणि विराटशी सविस्तर चर्चा करावी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.

भारताचे पुढील सामने कसे?

मागील वर्षी भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याच दिवशी कोहली आणि रोहित यांनी टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडच्या मालिकेआधी या दोघांनाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दोघेही आता केवळ एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहेत. भारतीय संघाचं आगामी वेळापत्रक पाहिलं तर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिका वगळल्यास  भारतीय संघ इतर सर्व दौऱ्यांमध्ये केवळ एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळे विराट आणि रोहित एकदिवसीय मालिकांतून ते खेळताना दिसू शकतील. मात्र, दुसरीकडे भविष्यातील प्लॅनिंगचा विचार केला तर विराट आणि रोहितच्या वयाचाही विचार करावा लागणार आहे.

नक्की वाचा >> गंभीर, आगरकर नाराज झाल्याने बुमराहचे 'तसले' लाड बंद? सिराजमुळे BCCI घेणार 'हा' निर्णय?

वर्ल्डकपआधीच बाहेर पडण्याची शक्यता का?

एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. त्या वेळी दोघांनी वयाची चाळिशी पार केलेली असेल. अशा वाढत्या वयात त्यांची शारीरिक क्षमता किती राहणार या सगळ्याचा विचार तरुण खेळाडूंची कामगिरी बघितल्यावर निश्चितपणे केला जाईल आणि चर्चेमधूनच या दोघांच्या निवृत्तीचा या वर्ल्डकपआधीच घेतला जाईल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वर्ल्डकप खेळण्याचं या दोघांचं स्वप्न अपूर्णच राहणार असल्याची चर्चा आहे.

FAQ

विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 वनडे विश्वचषक खेळणार आहेत का?

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, ते आता फक्त वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. तथापि, 2027 विश्वचषकादरम्यान कोहली 38 आणि रोहित 40 वर्षांचे असतील, त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता आणि फॉर्म यावर त्यांची निवड अवलंबून असेल. काही तज्ज्ञ, जसे की सुनील गावसकर, यांना वाटते की त्यांचा विश्वचषकात समावेश होणे कठीण आहे, पण सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास ते खेळू शकतात.

विराट आणि रोहित यांनी कसोटी आणि टी-20 मधून निवृत्ती का घेतली?

2025 मध्ये रोहित शर्माने 7 मे रोजी आणि विराट कोहलीने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर दोघांनी 2024 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. कसोटी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीतील कमी पडत आहेत. वनडे विश्वचषक 2027 साठी तयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी हे निर्णय घेतले.

विराट आणि रोहित यांच्या निवडीवर कोणते घटक परिणाम करतील?

त्यांची निवड त्यांच्या फॉर्म, फिटनेस आणि निवड समितीच्या धोरणांवर अवलंबून असेल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले की, जर ते सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिले, तर ते संघात राहू शकतात. मात्र, शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल आणि अभिषेक शर्मा यांसारख्या तरुण खेळाडूंची वाढती कामगिरी त्यांच्यासाठी आव्हान ठरू शकते.

 

Read More