मुंबई : भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टेस्ट सामना बंगळूरूच्या मैदानावर खेळला जातोय. टीम इंडिया हा सामना जिंकण्यापासून केवळ 9 विकेट्स दूर आहे. या सामन्यासाठी 100 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी विराटचे अनेक चाहते सामना पाहण्यासाठी आले आहेत. दरम्यान दुसऱ्या टेस्टमध्ये विराटचे काही चाहते सुरक्षा तोडून मैदानात घुसल्याचं दिसून आलं.
सध्या कोरोनाच्या साथीमुळे नियम कडक करण्यात आले आहेत. अशातच विराटचे काही चाहते सुरक्षारक्षकांना न जुमानता थेट मैदानात धुसल्याचं दिसून आलं.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील डे नाईट दुसऱ्या क्रिकेट टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. यावेळी दिवसाच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये तीन चाहते मैदानात घुसले. यावेळी एका चाहत्याने तर विराट कोहलीसोबत सेल्फी काढला. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना मैदानाबाहेर काढलं.
Finally got a selfie with @imVkohli
— ARAVIND (@DEVIL_VK18) March 13, 2022
Dream comes true
With my friend @DilipVK18pic.twitter.com/tz6CrJDzPo
श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी कुशल मेंडिसला मोहम्मद शमीचा बॉल लागल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. यावेळी खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी साधून तीन चाहते खेळाच्या परिसरात घुसले आणि खेळाडूंच्या दिशेने धावू लागले.
यावेळी एका चाहत्याला फिल्डींगला उभ्या असलेल्या कोहलीच्या जवळ जाण्याची संधी मिळालीच. त्याने मोबाईल काढून सेल्फी घेण्यास विचारलं. कोहलीने सेल्फीसाठी होकार दिल्यावर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
या सर्व प्रकारानंतर सुरक्षा कर्मचारी खेळाडूंच्या दिशेने धावले. अथक प्रयत्नांनंतर या चाहत्यांना पकडण्यात आलं. मोहालीतील पहिल्या टेस्टदरम्यानही एका चाहत्याने मैदानात प्रवेश केला होता.