Policeman Bowling Viral Video: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ हा इंडियन प्रमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने सर्वाधिक म्हणजेच 5 वेळा आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं आहे. या संघामध्ये संधी मिळालेले अनेकजण आज राष्ट्रीय संघाकडून खेळताना दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत चमकलेला तिलक वर्मा हे या खेळाडूंच्या लांबलचक यादीमधील ताजं उदाहरण आहे असं म्हणता येईल. मुंबई इंडियन्सचं फॅन फॉलोइंगही प्रचंड आहे. सोशल नेटवर्किंगवर मुंबई इंडियन्सच्या अकाऊंटवरुन क्रिकेटसंदर्भातील वेगवेगळे व्हिडीओ, फोटो आणि पोस्ट शेअर केल्या जातात. याच अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी अगदी उत्तम गोलंदाजी करताना दिसत आहे. वेगवान गोलंदाजी करताना हा पोलीस कर्मचारी एखाद्या गोलंदाजालाही लाजवेल इतक्या उत्तमरित्या गोलंदाजी करताना दिसत आहे. हा पोलीस कर्मचारी स्थानिक क्लबमधील नेट्समध्ये तरुण खेळाडूंना गोलंदाजी करताना दिसतोय. पोलीस कर्मचारी गणवेशात असतानाच गोलंदाजी करताना दिसतोय. मात्र त्याच्या गोलंदाजीची शैली आणि लय पाहता तो प्रोफेश्नल गोलंदाज वाटतोय. या पोलिसाच्या गोलंदाजीसमोर नेट्समध्ये सराव करणारी व्यक्तीही गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. स्विंग आणि योग्य लेंथने गोलंदाजी करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने एका चेंडूवर फलंदाजी करणाऱ्याला बोल्ड केल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ शेअर करताना मजेशीर कॅप्शन दिली आहे. 'हॅलो 100, आम्हाला या धोकादायक वेगासंदर्भात तक्रार नोंदवायची आहे,' असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे नमूद करण्यात आलेलं नाही. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडीओ...
'Hello, we'd like to report a case of
— Mumbai Indians (@mipaltan) August 10, 2023
Durjan Harsani#OneFamily #MumbaiIndians #MumbaiMeriJaan pic.twitter.com/mKT9QPbO1p
नेटकऱ्यांकडूनही या पोलीस कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी करणारा खेळाडू बोल्ड झाला आहे ते पाहून एकाने या संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे. अन्य एकाने या पोलीस कर्मचाऱ्याला खरोखरोच संधी दिली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. तर अन्य एकाने पोलिसाने टाकलेला चेंडू इतका उत्तम होता की फलंदाजाला कळलाच नाही असं म्हणत गोलंदाजीचं कौतुक केलं आहे. भारतीय संघातील सध्याचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सच्या संघातूनच पुढे आलेला खेळाडू आहे.