IPL 2025: राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) गुजरातविरोधातील सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकल्यानंतर सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. यासह वयाच्या 14 व्या वर्षी शतक ठोकणारा आणि तेही इतक्या कमी चेंडूत करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. गुजरातच्या पराभवानंतर सोशल मीडियासह सगळीकडे वैभव सूर्यवंशीची चर्चा आहे. एक्सवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पोस्ट शेअर करत वैभव सूर्यवंशीच्या खेळीचं कौतुक केलं आहे. सचिन तेंडुलकरच्या या पोस्टला वैभवने उत्तरही दिलं. मात्र त्याच्या एक्स अकाऊंटवर कारवाई करण्यात आली असून, ते बंद करण्यात आलं आहे. कारण हे अकाऊंट त्याचं नाव नसून बनावट आहे.
सोमवारी वैभव सूर्यवंशीच्या चांगल्या कामगिरीचा फायदा घेत वैभव सूर्यवंशीच्या नावे असणाऱ्या एका प्रोफाइलने @VaibhavOfficia या हँडलचा वापर केला. ज्यामुळे फॉलोअर्स आणि सहभाग प्रचंड वाढला. प्रोफाइलने डिस्प्ले पिक्चरमध्ये वैभवचा राजस्थानच्या जर्सीमधील फोटो वापरला. तर कव्हर फोटो इंडिया U19 व्हाइट्समधील वैभवचा होता.
बनावट प्रोफाइलने राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत एक्स हँडलवरून काही पोस्ट रिपोस्ट केल्या होत्या. तसंच सचिन तेंडुलकरच्या पोस्टला उत्तर देऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सचिन तेंडुलकरने वैभवच्या 38 चेंडूत 101 धावांच्या धमाकेदार खेळीमधील ठळक मुद्दे सांगितलं. "वैभवचा निर्भय दृष्टिकोन, फलंदाजीचा वेग, लवकर लांबीचा अंदाज घेणं आणि चेंडू टोलवताना ऊर्जा लगावणं हे त्याच्या शानदार खेळीमागील रहस्य आहे. अंतिम निकाल: 38 चेंडूत 101 धावा. छान खेळला!!," असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं.
Thank you so much Sir. It’s been a dream to earn a compliment from someone I’ve admired. Grateful beyond words https://t.co/cAaVK3YAHD
— Vaibhav Sooryavanshi (@Vaibhavsooryava) April 28, 2025
वैभवच्या बनावट प्रोफाइलवरुन तेंडुलकरच्या पोस्टला उत्तर देण्यात आलं. "खूप खूप धन्यवाद सर. मी आदर्श मानणाऱ्या व्यक्तीकडून अशी कौतुकाची थाप मिळणं हे स्वप्न होतं. शब्दांपलीकडची कृतज्ञता," असं उत्तर देण्यात आलं होतं.
बहुतेक एक्स युजर्सना हे वैभवचं अकाऊंट असल्याचं वाटलं आणि लक्ष वेधलं. त्याला 55 हजार लाईक्स आणि 4000 हून अधिक रिपोस्ट मिळाल्यानंतर, एक्सने चुकीची माहिती थांबवण्यासाठी कारवाई केली.
हे अकाउंट बनावट असण्याची तीन कारणे एक्सने दिली, ती खालीलप्रमाणे आहेत.
1) राजस्थान रॉयल्स फॉलो करत नाही (ते त्यांच्या सर्व खेळाडूंना फॉलो करतात)
2) अकाउंट हँडलच्या नावात 'Officia' असा उल्लेख. प्रोफेशनल अकाउंट अशी नावं टाळतात.
3) सर्व ट्विट्स आणि रिप्लाय 28 एप्रिल रोजी आले होते, ज्यामागे एंगेजमेंट वाढवण्याचा हेतू होता.
काही तासांनंतर हे अकाउंट निलंबित करण्यात आले, परंतु युजरने @Vaibhavsooryava या आयडीसह नवीन प्रोफाइल तयार करण्यासाठी त्याच क्रेडेन्शियल्सचा वापर केला. यात सचिन तेंडुलकरच्या ट्विटला उत्तर नव्हते, परंतु दुसरी पोस्ट तशीच राहिली.