IPL 2025: गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. दरम्यान आपल्या आई-वडिलांनी केलेल्या संघर्षामुळे आपल्याला यश मिळाल्याचं वैभव सूर्यवंशीने सांगितलं आहे. गुजरातने 210 धावांचं आव्हान दिल्यानंतर मैदानात उतरलेल्या वैभव सूर्यवंशीने तुफान फटकेबाजी केली. वैभव सूर्यवंशी वादळी खेळी करत असताना, दुसऱ्या टोकाला असणारा यशस्वीही त्याला स्ट्राईक देत प्रेक्षकाची भूमिका बजावत होता. अखेर जेव्हा त्याने 35 चेंडूत शतक ठोकलं तेव्हा राहुल द्रविड आणि खेळाडूंसह संपूर्ण स्टेडिअम जल्लोष करत होतं.
पण वैभव सूर्यवंशीचा या प्रवास वाटतो तितका सोपा झालेला नाही. आज आपण जे यश चाखत आहोत, त्यासाठी आपल्या आई-वडिलांनी फार संघर्ष केल्याचं त्याने सांगितलं आहे. आपल्या प्रॅक्टिस सेशनआधी आई सकाळी उठून डबा तयार करायची आणि वडिलांनी माझ्या गेमवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी नोकरी सोडलेली असा खुलासा त्याने केली आहे. आई-वडिलांच्या या कष्टाला आज वैभव न्याय देत असून, त्यांचा संघर्ष वाया न गेल्याचा सुखद अनुभव देत आहे.
"आज मी जे काही आहे ते माझ्या पालकांचे ऋण आहे. मला सरावाला जायचे असल्याने आई लवकर उठायची आणि माझ्यासाठी जेवण बनवायची. ती फक्त तीन तास झोपायची. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काम सोडलं होतं आणि माझा मोठा भाऊ आता ते सांभाळत आहे. आम्ही संघर्ष करत होतो. माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला आणि मी ते साध्य करू शकेन असं सांगितलं होतं. आज जो काही निकाल दिसत आहे आणि मी जे यश मिळवले आहे ते माझ्या पालकांमुळे आहे," असं वैभवने आयपीएलने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
He announced his arrival to the big stage in grand fashion
It’s time to hear from the 14-year old
वैभव 10 वर्षांचा असल्यापासून मैदानात घाम गाळत आहे. तो दिवसाला 600 चेंडू खेळायचा. त्यावेळी तो त्याच्यापेक्ष्या वयाने मोठ्या 16-17 वर्षीय गोलंदाजांना सामना करत असे. यासाठी त्याचे वडील संजीव सूर्यवंशी 10 अतिरिक्त डबे नेत असतं. वडिलांचे हे कष्ट आज यशाची चव चाखत आहेत. मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी त्यांची जमीनही विकून टाकली होती.
आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरविरुद्ध षटकार मारून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या वैभवने आता तीन सामन्यांमध्ये 75.50 च्या सरासरीने आणि 222.05 च्या स्ट्राईक रेटने 151 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 101 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल मेगा-लिलावात सूर्यवंशीला 1.1 कोटींमध्ये खरेदी करत राजस्थान रॉयल्सने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 27 मार्च 2011 रोजी बिहारमध्ये जन्मलेला वैभव हा यादीतील सर्वात तरुण खेळाडू आहे. जानेवारी 2024 मध्ये त्याने फक्त 12 वर्षं आणि 284 दिवसांचा असताना बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गेल्या वर्षी, तो चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या अंडर 19 सामन्यात सहभागी झाला होता, जिथे त्याने 58 चेंडूत शतक ठोकले होते.