Vaibhav Surywanshi: वैभव सूर्यवंशीसाठी आयपीएल 2025 छान होता. वैभवने आयपीएलच्या या मोसमात 252 धावा केल्या. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाजही ठरला. आयपीएलने वैभवला स्टार बनवलंय. सूर्यवंशीने आपल्या या आयपीएल हंगामाचा शेवट दमदार अर्धशतक ठोकून केला. सीएसके विरुद्धच्या सामन्यात सूर्यवंशीने 57 धावांची खेळी केली आणि टीमला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सूर्यवंशीची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान सूर्यवंशीने आयपीएलमध्ये पहिले शतक झळकावताना त्याच्यासोबत काय घडले? याबद्दल खुलेपणाने सांगितले.
'त्यावेळी मला खूप फोन येत होते. 500 हून अधिक मिस्ड कॉल आले. लोकांना माझ्याशी बोलायचे होते पण मी 4 दिवस माझा फोन बंद केला होता', असे वैभवने सांगितले. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडशी तो बोलत होता. पहिल्या शतकानंतर लोक त्याला कसे फोन करत होते आणि अभिनंदन करत होते याबद्दल त्याने सांगितले.
वैभव म्हणाला, 'पहिल्या शतकानंतर इतक्या लोकांनी मला खूप फोन आणि मेसेज केले. 500 हून अधिक मिस्ड कॉल आले, पण मी माझा फोन बंद केला. मला या सगळ्यात रस नाही. मी तुम्हाला हे देखील सांगितले होते', असे वैभव सांगतो. शतक ठोकल्यानंतर अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला पण मला ते फारसे आवडले नाही. मी माझा फोन 2-4 दिवस बंद ठेवला. मला जास्त लोकांमध्ये राहणे आवडत नाही. फक्त माझे कुटुंब आणि काही मित्र, ते पुरेसे आहे', असेही त्याने पुढे सांगितले.
या मुलाखतीदरम्यान राहुल द्रविडने वैभवला सांगितले की, 'पुढच्या हंगामात तुला आणखी चांगले खेळावे लागेल. सर्व गोलंदाज तुझ्याविरुद्ध अधिक रणनीती आखतील. त्यांनी या हंगामात तुला खेळताना पाहिलंय. पुढच्या हंगामात ते तुला शक्य तितक्या लवकर बाद करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुला आतापासूनच भविष्यासाठी तयारी सुरू करावी लागेल.'
त्याचवेळी वैभवने राहुल द्रविडला दिलेल्या मुलाखतीत आणखी माहिती दिली. मी अंडर-19 संघात खेळणार आहे. 19 वर्षांखालील टीमचाही कॅम्प होणार असून मला आता तिथे जायचंय, असेही त्याने यावेळी सांगितले. मुलाखतीतदरम्यान वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.