Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025: 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वयात फेरफार? विजेंदर सिंगच्या पोस्टने खळबळ; म्हणाला 'आजकाल क्रिकेटमध्ये....'

माजी बॉक्सर विजेंदर सिंगने (Vijender Singh) सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे क्रिकेटमध्ये वयात फेरफार केले जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांना त्याचा इशारा राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे असल्याचं वाटत आहे.   

IPL 2025: 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वयात फेरफार? विजेंदर सिंगच्या पोस्टने खळबळ; म्हणाला 'आजकाल क्रिकेटमध्ये....'

माजी बॉक्सर विजेंदर सिंगने (Vijender Singh) सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे क्रिकेटमध्ये वयात फेरफार केले जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भारतातील अनेक खेळांमधे खेळाडूंकडून वयात फेरफार केले जात असून, ही नियमित पद्धत आहे. खासकरुन ज्युनिअर किंवा वयोगटानुसार होणाऱ्या खेळात हा प्रकार जास्त जाणवतो. बीसीसीआयने यावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. बीसीसीआयने पडताळणी प्रक्रिया कठोर केली आहे. विजेंदर सिंगने एक्सवर कमेंट करताना 'आजकाल वय कमी दाखवत क्रिकेटमध्येही खेळत आहेत' असं म्हटलं आहे. 

विजेंदर सिंगने ही कमेंट केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. अनेकांनी त्याचा इशारा राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे असल्याचा दावा केला आहे. वैभव सूर्यवंशी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात लहान खेळाडू आहे. 

सोमवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात 14 वर्षीय सूर्यवंशीने तुफान फटकेबाजी करत अनेक विक्रम रचले. विशेष म्हणजे हा त्याचा तिसराच आयपीएल सामना होता. वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावे केले. आयपीएलमधील भारतीय खेळाडूने ठोकलेला हे सर्वात वेगवान आणि आतापर्यंतचे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे.

विजेंदरच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे की, “जरी वैभवने वयात फेरफार केला असला तरी वयाच्या 15-16 व्या वर्षी अशा फटकेबाजी करणं जबरदस्त आहे".

दुसऱ्या एका युजरने वैभवच्या मुलाखतीचा जुना व्हिडीओ पोस्ट केला असून, वैभव दावा करत आहे त्यापेक्षा नक्कीच मोठा आहे असं म्हटलं. 

“वैभव सूर्यवंशी 14 वर्षांचा नाही. हा 3-4 वर्षं जुना व्हिडिओ आहे जिथे त्याने स्वतः मान्य केलं आहे की तो त्याच्या वयापेक्षा लहान दिसतो. बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कारवाई करावी," असं एका युजरने म्हटलं आहे. 

वैभव सूर्यवंशीचं वय 14 वर्षं 32 दिवस असून, गुजरातविरोधातील सामन्यात 38 चेंडूत 101 धावा ठोकत जबरदस्त कामगिरी केली आहे. 

Read More