Virat Kohli : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर टी 20 क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. मात्र त्यानंतर तो वनडे, टेस्ट आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट कोहली 36 वर्षांचा असला तरी त्याचा फिटनेस आणि फॉर्म अजूनही कायम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सुद्धा त्याने फलंदाजीत दमदार परफॉर्मन्स देऊन टीम इंडियासाठी मोठी खेळी केली होती. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 भारतात खेळवला जाणार आहे. तेव्हा विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय परत घ्यावा अशी त्याच्या फॅन्सची इच्छा आहे. मात्र विराटने टी 20 फॉरमॅटमध्ये परतण्यासाठी एक अट ठेवली आहे.
विराट कोहली सोबतच टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी सुद्धा टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. टीम इंडियाच्या टी 20 संघाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आणि काही खेळाडूंनी त्यावेळी या तिघांना घेतलेला निवृत्तीचा निर्णय माघारी घेण्याची विनंती ड्रेसिंग रूममध्ये केली होती. मात्र तरी देखील विराट, रोहित आणि जडेजा हे आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर कायम राहिले. तसेच येत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. तेव्हा विराट कोहली कदाचित ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी टी 20 क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय परत घेईल अशी आशा त्याचे चाहते व्यक्त करतात. मात्र याबाबत स्वतः विराटने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : IPL पूर्वी मुंबई, लखनऊ, राजस्थान संघांना मोठा धक्का! 'या' स्टार खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत शंका
विराट कोहलीने याबाबत बोलताना म्हटले की, 'मी निवृत्तीनंतर ऑलिंपिक खेळण्यासाठी परत येणार नाही. पण जर आपण सुवर्णपदकासाठी फायनलमध्ये खेळत असू, तर मी एका सामन्यासाठी परत येईन, पदक जिंकेन आणि घरी परत जाईन'. असं म्हणून विराट हसला.
Virat Kohli said, I will not come back from retirement to play the Olympics. If we are playing for the Gold Medal, I will come back for one game, get a medal and go back home (smiles). pic.twitter.com/1jrPuc23z3
— Mufaddal Vohra (mufaddal vohra) March 15, 2025
36 वर्षांचा विराट कोहली वनडे आणि टेस्ट क्रिकेटमधून लवकरच निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरु आहे. तेव्हा विराट निवृत्तीनंतर नेमकं काय करणार असा प्रश्न त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आला. पीटीआयला दिलेल्या उत्तरात विराट म्हणाला, 'खरंतर मला सुद्धा माहित नाही की मी निवृत्तीनंतर काय करेन. काही दिवसांपूर्वीच मी माझ्या एका सहखेळाडूला हाच प्रश्न विचारला आणि मला सारखंच उत्तर मिळालं. हो पण मला वाटतंय कि निवृत्तीनंतर मी खूप फिरेन आणि प्रवास करेन'.
विराट कोहलीने आजतागायत 123 टेस्ट, 302 वनडे, 125 टी 20 आणि 252 आयपीएल सामने खेळले आहेत. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळताना विराटने एकूण 27599 धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने 8004 धावा सुद्धा केल्या आहेत. यासोबतच तो भारतीय संघाचा माजी कर्णधार सुद्धा आहे. विराटने आयपीएलमध्ये 8, वनडेत 51 , टेस्टमध्ये 30 तर टी 20 मध्ये एक शतक ठोकलं आहे.