Virat Kohli Injured : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवारी (9 मार्च) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा सामना हा न्यूझीलंडशी होणर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या फक्त एक दिवस आधी भारतीय चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा जखमी झाला आहे. हा दावा पाकिस्तानी वेबसाइट जिओ न्यूजने केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, विराट कोहलीला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली असून चेंडू त्याच्या गुडघ्याजवळ लागला आहे. त्यामुळे विराट कोहलीला त्रास होत असल्यामुळे सुरु असलेले सराव सत्र थांबवावे लागले.
दरम्यान, विराट कोहलीला चेंडू लागल्यानंतर लगेच भारतीय संघाच्या फिजिओने विराट कोहलीवर ताबडतोब उपचार केले. त्याच ठिकाणी विराटच्या गुडघ्यावर स्प्रे मारला आणि मलमपट्टी देखील केली. परंतु, संघ व्यवस्थापनाने काळजी करण्यासारखे काही नसल्याचे म्हटले आहे. विराट कोहली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुखापतीनंतरही विराट कोहलीने सोडले नाही मैदान
सराव करताना विराट कोहलीला दुखापत झाली. यावेळी सराव सामना थांबवण्यात आला. मात्र, दुखापत असताना देखील विराट कोहलीने मैदान सोडले नाही. या वेळी विराट कोहली इतर खेळाडूंना सराव करताना पाहत होता. कारण 9 मार्चच्या अंतिम सामन्यात त्याचे संघात असणे हे खूप महत्वाचे आहे. कारण तो सध्या उत्तम फॉर्ममध्ये खेळत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली चाहत्यांना अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन करत आहे.
विराट मोडणार ख्रिस गेलचा विक्रम?
विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना 8 हजारांहून अधिक धावांचा टप्पा आधीच ओलांडला आहे. जर या अंतिम सामन्यात विराट कोहलीने 46 धावा केल्या तर तो असा विक्रम करू शकतो. त्यानंतर तो या स्पर्धेत ख्रिस गेलला मागे टाकून आघाडीवर जाईल. विराट कोहलीने यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान 100 आणि ऑस्ट्रेलिया 84 विरुद्ध डाव खेळले आहेत. त्यामुळे विराट कोहली हा सध्या उत्तम खेळ खेळताना दिसत आहे.
विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 17 सामन्यांमध्ये आतापर्यंत 746 धावा केल्या आहेत. जे कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेले सर्वोच्च आहे. आता फक्त त्याच्या पुढे ख्रिस गेल आहे. ज्याने 17 सामन्यांमध्ये 791 धावा केल्या आहेत. याचा अर्थ असा की विराट कोहलीला अंतिम सामन्यात 46 धावा करताच ख्रिस गेलचा विक्रम मोडेल. तिसऱ्या क्रमांकावर महेला जयवर्धन आहे.