Virat Kohli New Look: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही प्रत्येक सामना आणि मालिकेनंतर त्याच्या नावाची चर्चा होती. नुकतंच झालेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेनंतरही विराटची चर्चा आहे. विराट कोहली असता तर मालिकेचा निकाल वेगळा असता असा दावा क्रिकेट चाहते करत आहेत. यामुळेच काही चाहत्यांकडून विराट कोहलीने पुन्हा कसोटी संघात परतावं अशी मागणी केली जात आहे. पण विराटने आपण आता कसोटी खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान त्याचा एक फोटो समोर आला असून, तो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
भारतासाठी चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळल्यानंतर क्रिकेटपासून दूर गेलेला विराट कोहली नुकताच लंडनमध्ये नवीन लूकमध्ये दिसला. भारतीय वंशाचे उद्योजक शश यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये, कोहलीने फिकट राखाडी रंगाच्या टी-शर्टवर गडद राखाडी रंगाची हुडी घातली आहे. तसेच गडद निळ्या रंगाचे जॉगर्स घातले होते. पण त्याच्या दाढी आणि मिशीच्या रंगाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. फोटोमध्ये विराटची दाढी आणि मिशी पूर्ण पाढरी झाल्याचं दिसत आहे.
विराट कोहलीने नुकतंच एका कार्यक्रमात आपण केसांना रंग लावत असल्याचा खुलासा केला आहे. "दोन दिवसांपूर्वी मी माझे केस रंगवले होते. जेव्हा तुम्ही दर चार दिवसांनी असं करणं सुरु करता तेव्हा वेळ झाली असं समजावं," असं कोहलीने लंडनमध्ये युवराज सिंगकडून आयोजित कार्यक्रमात सांगितलं होतं.
इंग्लंड कसोटी मालिकेनंतर आता भारतीय संघ ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार होती. पण , बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वचनबद्धता आणि दोन्ही संघांच्या वेळापत्रकाच्या सोयी लक्षात घेऊन ही मालिका सप्टेंबर 2026 पर्यंत पुढे ढकलली. जर ती मालिका झाली असती तर कोहली आणि रोहित शर्मा यांना पु्न्हा एकदा भारतीय जर्सीत खेळताना पाहण्याची संधी मिळाली असती. थोडक्यात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापूर्वी कोहली आणि रोहितचे पुनरागमन होणार नाही जोपर्यंत नवीन मालिका जाहीर केली जात नाही.
भारत या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबरमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. बीसीसीआयला ऑगस्टमध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेकडून ऑफर मिळाली असल्याची माहिती आहे. तथापि, एका वृत्तानुसार, श्रीलंकेतील मालिका होणार नाही, कारण खेळाडूंना दोन महिन्यांच्या मालिकेनंतर 'पूर्ण विश्रांती' देण्यात आली आहे जिथे पाचही कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यंत खेळले गेले.
FAQ
1) विराट कोहली सध्या कोणत्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये सक्रिय आहे?
विराट कोहलीने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या फक्त एकदिवसीय (ODI) क्रिकेट खेळतो. त्याने शेवटचा सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता, जिथे भारताने न्यूझीलंडला हरवून विजेतेपद पटकावले.
2) विराट कोहली भारतीय संघात कधी परतणार आहे?
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे भारतीय संघात पुनरागमन ऑक्टोबर २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत होणार नाही, कारण बीसीसीआयने बांगलादेश दौऱ्याचा कार्यक्रम सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलला आहे. भारत ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे
3) विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली?
मे २०२५ मध्ये विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ९,२३० धावा केल्या, सरासरी ४६.८५. त्याच्या निवृत्तीचा निर्णय त्याचा वैयक्तिक होता, आणि बीसीसीआयने याला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे रोहित शर्मानेही कसोटीमधून निवृत्ती घेतली.