Washington Sundar's Father appeals Team India : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासाठी काही खेळाडूंचं वैयक्तिक प्रदर्शन विशेष लक्षवेधी ठरत आहे. शुभमन गिलने नेतृत्व करताना जबरदस्त फलंदाजी केली, तर के.एल. राहुल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंनी सातत्य राखलं. मात्र, या चमकत्या नावांच्या मध्ये एक नाव जरा कमी गाजलं आणि ते म्हणजे वॉशिंगटन सुंदरचं. त्याने दमदार कामगिरी केली. त्याने मँचेस्टर कसोटीत शतक झळकावून सामना अनिर्णित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण असे असूनही, वॉशिंग्टनचे वडील एका गोष्टीवर नाराज आहेत आणि त्यांनी टीम इंडियाकडून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे.
मॅंचेस्टर कसोटीत वॉशिंगटन सुंदरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक ठोकत संघाला पराभवापासून वाचवलं. रवींद्र जडेजासोबत 203 धावांची भागीदारी करत भारताला बरोबरी साधता आली. सुंदरने सामना संपवणारा शेवटचा फटका मारत आपलं शतक पूर्ण केलं. मात्र, या परफॉर्मन्सनंतरही त्याच्या वडिलांची नाराजी लपली नाही.
हे ही वाचा: मॅंचेस्टर टेस्ट ड्रॉ झाली पण आनंदावर विरजण, BCCIने मध्यरात्री दिली धक्कादायक माहिती
सुंदरच्या वडिलांनी, एम. सुंदर यांनी एका मुलाखतीत थेट मत व्यक्त करत सांगितलं, "वॉशिंगटननं सातत्याने चांगलं प्रदर्शन केलं आहे, पण लोक त्याला विसरतात. बाकी खेळाडूंना सलग संधी दिली जाते, पण फक्त माझ्या मुलालाच नाही." त्यांनी हीही नाराजी व्यक्त केली की वॉशिंगटनला पहिल्या कसोटीत स्थान न देणं हे अचंबित करणारं होतं. त्यांच्या मते, वॉशिंगटनने गाबा टेस्ट (2021) मध्ये पदार्पण करताच टीमच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती, पण त्यानंतर त्याला नियमितपणे संधीच दिली गेली नाही.
हे ही वाचा: Jasprit Bumrah: शेवटच्या टेस्टमध्ये बुमराह खेळणार? कोच गौतम गंभीरने दिले संकेत, म्हणाला 'भारतीय संघातील...'
सुंदरच्या वडिलांनी केवळ तक्रार केली नाही, तर टीम इंडियाकडे एक मोठी आणि ठोस मागणीही केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, "वॉशिंगटनला फलंदाजीसाठी कायम पाचव्या क्रमांकावरच उतरवावं, जसं की मॅंचेस्टरच्या दुसऱ्या डावात झालं. त्याला सलग 5-10 संधी मिळाल्या तर तो अजून जबरदस्त कामगिरी करेल."
वॉशिंगटन सुंदरने मालिकेतील दुसऱ्या टेस्टपासून संधी मिळाल्यावर, चौथ्या कसोटीपर्यंत 6 डावांमध्ये 205 धावा आणि 5 डावांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या ऑलराउंड कामगिरीमुळे तो संघात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.