चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने सहा गडी राखून दारुण पराभव केल्यानंतर पाकिस्तान संघावर सडकून टीका केली जात आहे. भारताने पराभव केल्याचं शल्य चाहत्यांच्या मनात असतानाच न्यूझीलंडने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाची इतकी वाईट अवस्था कधीच झाली नव्हती. पाकिस्तान संघ एकेकाळी आपल्या घातकी गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. पण आता संघात एकही असा खेळाडू नाही जो एकहाती सामना जिंकवून देऊ शकेल. यामुळे पाकिस्तानी चाहते आणि माजी क्रिकेटर्सने संघाकडून कोणती अपेक्षा करणंही सोडून दिलं आहे. पाकिस्तान संघ आता अशा स्थितीत गेला आहे की, त्यांना उभारी घेण्यासाठी फार वेळ लागू शकतो.
पाकिस्तान संघाने 2017 मध्ये अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती. पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा केलेला हा अखेरचा पराभव ठरला होता. तेव्हापासून पाकिस्तान संघ भारताविरोधातील एकही एकदिवसीय सामना जिंकू शकलेला नाही. दरम्यान नुकत्याच झालेल्या पराभवानंतर वसीम अक्रमने पाकिस्तान संघावर सडकून टीका केली आहे. भारताविरोधातील सामन्यात त्यांचा डाएट पाहून तर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
"मला वाटतं तो पहिला किंवा दुसरा ड्रिंक ब्रेक होता. त्यादरम्यान खेळाडूंसाठी केळींनी भरलेली प्लेट ठेवण्यात आली होती. इतकी केळी तर माकडंही खात नाहीत आणि हे त्यांचं अन्न होतं. जर त्यांच्याजागी आमचे कर्णधार इम्रान खान असते तर आम्हाला मार खावा लागला असता," असं वसीम अक्रमने सामन्यानंतर सांगितलं.
ज्या काळात खेळाचा वेग अनेक पटीने वाढला आहे त्या काळात ते 'पुरातन क्रिकेट' खेळत असल्याचा आरोप करत अक्रमने पाकिस्तान संघावर टीका केली आहे. "महत्त्वाची पावलं उचलण्याची गरज आहे. आपण गेल्या अनेक काळापासून फक्त पुरातन क्रिकेट खेळत आहोत," असं वसीम अक्रमने 'ड्रेसिंग रुम' शोमध्ये म्हटलं आहे.
पुढे त्याने सांगितलं की, "हे बदलण्याची गरज आहे. तुम्ही निडर आणि तरुण क्रिकेटर्स संघात आणले पाहिजेत. जर तुम्हाला सहा ते सात बदल करावे लागत असतील तर ते करा. तुम्ही ससलग सहा महिने पराभूत होत राहाल. पण ठीक आहे, वर्ल्ड कप टी 20-2026 साठी आतापासून संघ तयार करा".
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान गोलंदाज वारंवार अपयशी ठरत असल्याने वसीम अक्रम यांनी नाराजी जाहीर करत चिंता दर्शवणारी आकडेवारी सादर केली आहे. "आता हे बास झालं. तुम्ही त्यांना स्टार केलं आहे. मागील पाच एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 60 च्या सरासरीने 24 विकेट्स घेतले आहेत. म्हणजेच 60 धावांना एक विकेट घेत आहेत," असं वसीम अक्रमने सांगितलं.
तो म्हणाला की, "आमची सरासरी ओमान आणि यूएसएपेक्षाही खराब आहे. एकदिवसीय सामने खेळणाऱ्या 14 संघांमध्ये पाकिस्तानची गोलंदाजी सरासरी दुसऱ्या क्रमांकावर आहे".