Shocking Incident in Stadium: क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा विचित्र घटना घडतात. कधी पावसामुळे सामना थांबतो, तर कधी सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे खेळाडूंना त्रास होतो. पण मैदानात अचानक कार घुसल्याचं कधी ऐकलंय का? हो, असंच काहीसं घडलं होतं. या घटनेनंतर सध्याचे भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ऋषभ पंतही स्तब्ध झाले. मैदानाच्या मध्यभागी गाडी पाहिल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला. 2017 च्या रणजी ट्रॉफी सामन्यात हे घडलं होतं, ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता.
ही घटना दिल्लीतील पालम वायुदल मैदानावर घडली. त्या दिवशी दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश असा रणजी ट्रॉफीचा सामना सुरू होता. मैदानावर गौतम गंभीर, ईशांत शर्मा, ऋषभ पंत आणि सुरेश रैना असे दिग्गज खेळाडू उपस्थित होते. सामना सुरू असताना अचानक एक व्हॅगनार कार थेट मैदानात शिरली, आणि प्रेक्षकांसह खेळाडूंही गोंधळे.
कार चालवणाऱ्या व्यक्तीने थेट सिक्युरिटी तोडून मैदानात कार घुसवली. विशेष म्हणजे त्या मैदानाचा मुख्य गेट रस्त्यालाच लागून होता, त्यामुळे तो सहज आत घुसला. या घटनेनंतर मैदानावर गोंधळ माजला आणि काही वेळासाठी सामना थांबवावा लागला.
ड्रायव्हरला तत्काळ पकडलं गेलं. चौकशीत त्याने सांगितलं की, हे सर्व त्याच्याकडून चुकून घडलं. त्याला काही कळायच्या आत तो गोंधळून गेला होता. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आणि सुरक्षा यंत्रणांवरही प्रश्न उपस्थित झाले.
ही घटना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र घटनांपैकी एक मानली जाते. सामना थांबवण्याच्या अनेक कारणांपैकी मैदानात कार घुसल्यामुळे सामना थांबवण्याचा हा प्रकार फारसा ऐकण्यात येत नाही. नंतर सामना पुन्हा सुरू झाला, पण हा प्रसंग सर्वांच्या आठवणीत कायमचा कोरला गेला.