Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कधी पासून सुरु होणार PKL 12? पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्स विरुद्ध तामिळ थलाइवाज येणार आमनेसामने

Pro Kabaddi League 2025: पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्स विरुद्ध तामिळ थलाइवाज एकमेकांसमोर येणार आहेत.  विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई आणि दिल्ली या शहरांमध्ये हे सामने  रंगणार आहेत.   

कधी पासून सुरु होणार PKL 12? पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्स विरुद्ध तामिळ थलाइवाज येणार आमनेसामने

When will PKL 12 start: देशातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय स्पर्धांपैकी एक असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामाची सुरुवात यंदा 29 ऑगस्टपासून होणार आहे. देशभरातील कबड्डीप्रेमींसाठी हा हंगाम पुन्हा एकदा थरार घेऊन येत आहे. या वर्षी सामन्यांचं आयोजन चार प्रमुख शहरांमध्ये  विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई आणि दिल्ली करण्यात येणार आहे. देशातील सर्व १२ प्रमुख संघ पुन्हा एकदा विजेतेपदासाठी आमने-सामने भिडतील. उद्घाटन सामना विशाखापट्टणमच्या राजीव गांधी इंडोअर स्टेडियममध्ये होणार असून, पहिल्या दिवशी तेलगू टायटन्स आणि तामिळ थलाइवाज आमनेसामने असतील. त्याच दिवशी दुसरा सामना बेंगळुरु बुल्स आणि पुनेरी पलटन यांच्यात रंगणार आहे.

जबरदस्त थरार पाहायला मिळणार

30 ऑगस्ट रोजी तेलगू टायटन्स पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून, त्यांच्यासमोर यूपी योद्धाज हे आव्हान असेल. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यू मुम्बा आणि गुजरात जायंट्स भिडतील. 31 ऑगस्टला म्हणजेच 'सुपर संडे'च्या दिवशीही प्रेक्षकांना दोन जबरदस्त सामने पाहायला मिळणार आहेत.  एकीकडे तामिळ थलाइवाज विरुद्ध यू मुम्बा, तर दुसऱ्या सामन्यात गतविजेते हरियाणा स्टीलर्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात टक्कर होणार आहे. लीगच्या केवळ पहिल्या तीन दिवसांतच जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.

विशाखापट्टणमचं पुनरागमन विशेष आकर्षण

विशाखापट्टणममध्ये तब्बल सात वर्षांनंतर प्रो कबड्डी लीगचं आयोजन होत आहे. याआधी येथे सीझन 1,3 आणि शेवटचं सीझन 6 (2018) मध्ये सामने खेळवले गेले होते. त्यामुळे शहर पुन्हा एकदा कबड्डीच्या नकाशावर झळकणार आहे. 

पुढचा टप्पा जयपूरमध्ये

12 सप्टेंबरपासून लीगचा पुढचा टप्पा जयपूरमध्ये सुरू होणार आहे. येथील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पहिले दोन सामने  जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बेंगळुरु बुल्स आणि तामिळ थलाइवाज विरुद्ध बंगाल वॉरियर्स  खेळवले जातील. जयपूरचं प्रो कबड्डीमध्ये खास स्थान आहे. याच शहरात लीगचा ऐतिहासिक 1000वा सामना सीझन 10 मध्ये खेळवला गेला होता.

तिसरा टप्पा चेन्नईत सुरू

तिसरा टप्पा 29 सप्टेंबरपासून चेन्नईत सुरू होईल. येथील एसडीएटी मल्टीपर्पज इंडोअर स्टेडियममध्ये यूपी योद्धाज विरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना सलामीचा असेल. दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली केसी आणि हरियाणा स्टीलर्स आमने-सामने येतील. विशेष म्हणजे या सामन्यात स्टार रेडर नवीन कुमार आपल्या जुन्या संघाविरुद्ध खेळताना दिसेल.

शेवटचा टप्पा दिल्लीत 

13 ऑक्टोबरपासून शेवटचा टप्पा दिल्लीतील त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडेल. येथे लीग टप्प्याचे निर्णायक सामने खेळवले जातील. याची सुरुवात पटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स आणि यू मुम्बा विरुद्ध यूपी योद्धाज अशा रोमांचक डावांनी होईल.

ट्रिपल हेडरने होणार लीग फेचा शेवट

यंदा लीग टप्प्याचा शेवट प्रत्येक दिवशी तीन सामन्यांनी (ट्रिपल हेडर) होणार असून, यामुळे कबड्डी प्रेमींसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे. त्यानंतर स्पर्धा प्लेऑफ टप्प्यात प्रवेश करेल, ज्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

मशाल स्पोर्ट्सचे बिझनेस हेड आणि प्रो कबड्डी लीगचे कमिश्नर अनुपम गोस्वामी यांनी सांगितलं, “सीझन 12 ही आमच्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. मल्टी-सिटी फॉरमॅटमुळे आम्ही देशभरातील कबड्डीप्रेमींसोबत पुन्हा जोडत आहोत आणि अशा शहरांमध्ये परत जात आहोत जिथे कबड्डीला प्रचंड प्रेम मिळतं. विशाखापट्टणममध्ये पुन्हा आयोजन होत असल्याचं आम्हाला समाधान आहे.”

अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने, मशाल स्पोर्ट्स आणि जिओस्टारने मिळून प्रो कबड्डी लीगला देशातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धांमध्ये स्थान मिळवून दिलं आहे. या लीगमुळे पारंपरिक भारतीय खेळ कबड्डीला नवसंजीवनी मिळाली असून, अनेक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करता आली आहे. थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग जिओ सिनेमा/हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

Read More