Anderson-Tendulkar Trophy 2025: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या अत्यंत रोमहर्षक टप्प्यावर पोहोचली आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरू असलेल्या या मालिकेत इंग्लंड 2-1 अशा आघाडीत आहे. आता 31 जुलैपासून शेवटचा आणि निर्णायक सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
चौथी कसोटी बरोबरीत सुटल्याने भारताची मालिका जिंकण्याची संधी आता संपली आहे . पण अंतिम सामना जिंकून भारत मालिकेला 2-2 ने बरोबरीत आणू शकतो. दुसरीकडे, इंग्लंडला मालिका जिंकण्यासाठी फक्त ड्रॉ जरी मिळाला तरी ते पुरेसं ठरणार आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यातही जबरदस्त टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हा प्रश्न सध्या अनेक चाहत्यांच्या मनात आहे की मालिका बरोबरीत सुटली, तर ट्रॉफी कोणाकडे जाणार? जर 2-2 अशी बरोबरी झाली, तर ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ कोणाकडे जाणार? त्याचं उत्तर थोडं तांत्रिक असलं तरी सोपं आहे. जर मालिका ड्रॉ झाली, तर ट्रॉफी त्या संघाकडेच राहते, ज्याने ती याआधी जिंकली होती.
आत्ताची ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ हीच ट्रॉफी पूर्वी ‘पतौडी ट्रॉफी’ म्हणून ओळखली जात होती. 2021-22 साली भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये झालेली मालिका अनिर्णित राहिली होती. त्याआधी, 2018 मध्ये इंग्लंडने भारताला 4-1 ने हरवत ट्रॉफी जिंकली होती आणि तेव्हापासून ही ट्रॉफी इंग्लंडकडेच आहे. त्यामुळे, यंदाची मालिका 2-2 ने संपली, तरी अंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी इंग्लंडकडेच राहणार आहे.
भारतीय संघासाठी एक मोठी चिंता वाढली आहे. मॅंचेस्टर कसोटीदरम्यान यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत गंभीर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, पंतच्या उजव्या पायाच्या पंजाला खेळादरम्यान जबर दुखापत झाली. तपासणीनंतर स्कॅन रिपोर्टमध्ये फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर वैद्यकीय टीमने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय तज्ज्ञांची टीम पंतच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे आणि पुनर्वसन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, निवड समितीने पंतच्या अनुपस्थितीत तामिळनाडूचा यष्टीरक्षक एन. जगदीशन याला संघात संधी दिली आहे. जगदीशनला आता कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, एन. जगदीशन (यष्टीरक्षक).